नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ मध्ये विविध देशांचे सातत्याने दौरे केले. या काळात, परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये झालेली प्रचंड गर्दीही चर्चेचा विषय ठरली. माहिती अधिकाराच्या अर्जातून मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या भूतान, कुवेत, युक्रेन आणि अमेरिका यांसारख्या देशांतील दौऱ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे समोर आले आहे. या दौऱ्यांसाठी लागणारा निधी पंतप्रधान कार्यालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय, परदेशात पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी उपस्थित होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थेचा खर्चही पंतप्रधान कार्यालयाने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पारदर्शकता कार्यकर्ते कमोडोर (निवृत्त) लोकेश बत्रा यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरांमधून ही माहिती उघड झाली आहे.
बत्रा यांना पंतप्रधानांच्या सर्व परदेश दौऱ्यांचा एकूण खर्च अद्याप मिळालेला नसला तरी, २०२३ मध्ये १६ देशांच्या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाची काही झलक मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधानांच्या दोन रशिया दौऱ्यांवर १५ कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला, तर अबू धाबी दौऱ्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च झाला.
तथापि, अनेक देशांतील भारतीय दूतावासांनी बत्रा यांच्या माहितीच्या अधिकाराच्या अर्जांना अद्याप उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सर्व परदेश दौऱ्यांवरील एकूण खर्च अद्याप स्पष्ट झालेला नाही. सध्या केवळ मॉस्को आणि अबू धाबी येथील दूतावासांकडूनच माहिती देण्यात आली आहे, ज्यावरून अंदाज बांधता येतो की या दौऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असेल.
अबू धाबीमधील भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये मोदींच्या यूएई दौऱ्यासाठी ४.९५ कोटी रुपये खर्च करण्यात आला, जो ‘ट्राय-कौन्सिल बजेट हेड’ अंतर्गत आला होता.
मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ मध्ये मॉस्को आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये काझान येथे झालेल्या पंतप्रधान मोदींच्या दोन दौऱ्यांसाठी १५ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला. जुलैमध्ये मॉस्कोच्या दौऱ्यावर एकूण ५.१२ कोटी रुपये खर्च करण्यात आला, ज्यामध्ये हॉटेलसाठी १.८१ कोटी रुपये, दैनिक भत्त्यासाठी २०.८१ लाख रुपये, स्वागत समारंभासाठी १.८७ कोटी रुपये, वाहतूक व्यवस्थेसाठी ५९.०६ लाख रुपये आणि विविध इतर खर्चासाठी ६२.५६ लाख रुपये समाविष्ट होते. ऑक्टोबरमध्ये काझान येथे झालेल्या दौऱ्यावर राज्याच्या तिजोरीतून १०.२४ कोटी रुपये खर्च झाले.