पाटण : तालुक्यातील तारळी धरणावर अदानी समूहाकडून सुरू असलेल्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश वन विभागाने देऊनही ते प्रत्यक्षात सुरूच असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी (दि. १७) सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली असता, तेथे कामकाज सुरू असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
पाटण तालुक्यातील तारळी धरणाच्या परिसरात अदानी समूहाकडून गेल्या दीड वर्षापासून तारळी पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची अनिवार्य पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याची गंभीर बाब वन विभागाच्या तपासणीमध्ये उघड झाली होती. तसेच, सह्याद्रीच्या पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागात प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि उत्खनन झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाटण वनपरिक्षेत्र कार्यालयाने १३ नोव्हेंबर रोजी प्रकल्प व्यवस्थापनाला अधिकृत 'कारणे दाखवा' नोटीस बजावली होती. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी नसताना प्रत्यक्ष कामकाज सुरू ठेवणे, हे प्रचलित वन व वन्यजीव संरक्षण कायद्यातील तरतुदींचे थेट उल्लंघन असल्याचे या नोटिशीत स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे रीतसर वैधानिक परवानगी मिळेपर्यंत प्रकल्पाचे सर्व कामकाज तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश वन विभागाने दिले होते. याशिवाय, तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा तसेच वृक्षतोड आणि इतर आवश्यक परवानग्यांची कागदपत्रे सादर न केल्यास किंवा काम सुरूच ठेवल्यास कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला होता.
मात्र, वन विभागाच्या या स्पष्ट आदेशानंतरही प्रकल्प व्यवस्थापनाकडून काम थांबवण्यात आले नसल्याचे चित्र समोर आले आहे. मंगळवारी (दि. १७) सामाजिक कार्यकर्त्यांनी तारळी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, तेथे मशिनरीच्या साहाय्याने प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकाऱ्यांनी या विषयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा उत्तर देणे टाळले.
दरम्यान, या प्रकल्पाच्या कामकाजाविरोधात मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालय आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच, अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'सह्याद्री वाचवा' मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी या वृक्षतोडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता वन विभागाच्या नोटिशीचे उल्लंघन करून काम सुरू ठेवणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापनावर वन विभाग व जिल्हा प्रशासन कोणती कठोर कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
वन विभागाच्या 'कारणे दाखवा' नोटिशीला केराची टोपली; तारळी पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाचे काम अद्यापही सुरूच
by Team Satara Today | published on : 17 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा