सातारा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सातारा जिल्ह्याने राजकीय कूस बदलली आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत दहापैकी तब्बल सात नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवून सातारा जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे. खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या यशस्वी रणनीतीपुढे महाविकास आघाडीचा टिकाव लागला नाही. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगरपालिकेत सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्षात भाजपने बाजी मारली. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांचे चिरंजीव अनिकेतराजे निंबाळकर यांचा पराभव करत रामराजेंच्या तीस वर्षांच्या साम्राज्याला सुरुंग लावत त्यांचे अक्षरशः पानिपत केले आहे. वाईमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आ. मकरंद पाटील यांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपने सुरुंग लावला. 'किचन कॅबिनेट'च्या सल्ल्यामुळे आबांची अडचण झाल्याची चर्चा आहे. येथे भाजपचे अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीच्या नितीन कदम यांचा पराभव करत नगराध्यक्षपद मिळवले. राष्ट्रवादीला १२ जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्ष भाजपचा झाल्याने मकरंद पाटलांची राजकीय कोंडी झाली आहे.
साताऱ्यात 'पॉवर'फुल विजय; कराडमध्ये भाजप बॅकफूटवर
सातारा पालिकेत खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ५० नगरसेवकांच्या लढतीत वर्चस्व राखले. अमोल मोहिते यांनी विजयाचा गुलाल उधळला. मात्र, येथे आठ टर्मची परंपरा असलेल्या अशोक मोने यांचा सागर पावशे यांनी पराभव करत दिग्गजांना धक्का दिला. दुसरीकडे, कराडमध्ये जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि राजेंद्र यादव यांच्या युतीने गड राखला. येथे शिंदे गटाचे राजेंद्र यादव विजयी झाले.
रहिमतपूरला 'गड आला पण सिंह गेला'
रहिमतपूरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. सुनिल माने गटाचे ११ नगरसेवक निवडून आले, पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या वैशाली माने यांनी ५५ मतांनी निसटता विजय मिळवला. त्यामुळे सुनिल माने गटाची अवस्था 'गड आला पण सिंह गेला' अशी झाली.
म्हसवड, मेढा आणि मलकापूरमध्ये भाजप सुसाट
म्हसवडमध्ये आ. जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली असून पूजा वीरकर विजयी झाल्या आहेत. येथे राष्ट्रवादीच्या अभय जगताप गटाला अपयश आले. मेढ्यात भाजपच्या रूपाली वारागडे तर मलकापूरमध्ये तेजस सोनावले यांनी भाजपचा झेंडा फडकवला.
पाचगणीत अवघ्या २ मतांनी थरार
पाचगणीत कमालीची चुरस पाहायला मिळाली. येथे अजित पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार दिलीप बगाडे यांनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळवला. महाबळेश्वरमध्येही अजित पवार गटाचे सुनील शिंदे १४५१ मतांनी विजयी झाले.
जिल्ह्यातील विविध नगरपालिकेवर निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष :
सातारा - अमोल मोहिते, भाजप
फलटण - समशेरसिंह नाईक-निंबाळकर, भाजप
वाई - अनिल सावंत, भाजप
मलकापूर - तेजस सोनावले, भाजप
म्हसवड - पूजा वीरकर, भाजप
रहिमतपूर - वैशाली माने, भाजप
मेढा (न.प.)- रूपाली वारागडे, भाजप
कराड - राजेंद्र यादव, शिवसेना (शिंदे गट)
पाचगणी - दिलीप बगाडे, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
महाबळेश्वर - सुनील शिंदे, राष्ट्रवादी (अजित पवार गट)