मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातील असल्याचे समोर आले असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हितेश झेंडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलुंडच्या जंगलातून पोलिसांनी मोठ्या कसोशीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हितेश धेंडे याचे ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरक्षारक्षकांशी वाद झाले होते. याच रागातून त्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करण्याची धमकी इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. हि क्लिप व्हायरल होताच, ठाण्यात शिवसैनिकांकडून संपात व्यक्त होऊ लागला. वागळे इस्टेट भागातील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी परेश चाळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलिस ठाणे गाठले आणि शिंदे यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर परेश चाळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हितेश प्रकाश धेंडे (२६) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी ६ तपास पथके रवाना करत आरोपी हितेश झेंडे याचा कसून शोध घेतला. यावेळी मुलुंडच्या घोटीपाडा परिसरातील जंगलात हितेश पोलिसांना सापडला. त्याला ताब्यात घेऊन श्रीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे. त्याने असे कृत्य का केले, हे अद्याप समजू शकलेले नसून पोलिस त्याचा तपास करित आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. ठाण्यातील श्रीनगर येथील वारली पाडा येथे राहणारा तरूण ज्याचे नाव हितेश धेंडे आहे त्याने शिंदेंना धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट केला. हितेशचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संबंधित तरुणाविरोधात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली.दरम्यान, हा तरूण विकृत प्रवृत्तीचा असून त्याने ही पोस्ट का केली, एकनाथ शिंदे यांना धमकी का दिली याचा पोलीस तपास करत आहेत.