सातारा - स्त्री चळवळीची वाटचाल मानव मुक्तीची आहे. स्त्री - पुरुष समता, समानता व न्यायासाठी मुंबईतील आझाद मैदानावर येत्या २१ डिसेंबर रोजी हिंसामुक्ती रॅली काढण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी स्त्री संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या संयोजक वृषाली मगदूम ( मुंबई)यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने 'मी आणि माझे लेखन 'या विषय सूत्रावर आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या वर्षातील थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे होते. विचारमंचावर उपाध्यक्ष प्रा.प्रशांत साळवे, सहकार्यवाह डॉ.सुवर्णा यादव व रयत शिक्षण संस्थेच्या मलकापूर येथील डॉ. एन. डी. पाटील कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डॉ. अजित मगदूम उपस्थित होते.
प्रा. वृषाली मगदूम म्हणाल्या, माझ्या लेखनाचे प्राधान्यक्रम व प्रयोजन सामाजिक कार्य हेच आहे. मी सामाजिक कामाच्या अनुभूतीचे उपेक्षित, गांजलेल्या, शोषित, वंचित महिलांच्या व्यथा वेदनांचे साहित्य लिहिते. मी माणसे वाचते.अन्यायग्रस्त, पिचलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करते. या महिला माझ्या कथा लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत.
बदललेली मूल्य व्यवस्था भ्रष्टाचार,व्यसनाधीनता, आरोग्य,बेकारी यात पोळलेल्या महिलांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे भयानक प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे झाले आहेत. समाजात बाल लैंगिक अत्याचाराची विकृती बोकाळलेली आहे. उच्चवर्णीय तसेच एअर कंडिशन मध्ये बसलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांच्या दुःख,दैन्याची धाहकता समजत नाहीत. या कामाला नियमांचा आधारही नाही त्यामुळे न्यायाचा संघर्ष खूप थकवणारा आहे. पीडित कचरा वेचक महिलांच्या थक्क व सुन्न करणाऱ्या कथा त्यांनी यावेळी कथन केल्या.
स्त्री चळवळ पन्नास वर्षानंतर आता कुठे पोहोचली. काय कमावले,काय गमावले? याचा धांडोळा घेण्याचे काम स्त्रीमुक्ती परिषद करीत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी परिषदा तसेच जिल्हावार एकल महिलांच्या प्रश्नावर कार्यशाळा घेण्यात येत आहेत. या अभियानास महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश इंजे यांनी केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी आभार मानले. संबोधी प्रतिष्ठानचे संघटक दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, सामाजिक कार्यकर्त्या हेमा सोनी तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त व विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.