दक्षिण काशी संगम माहुली येथे त्रिपुरारी पौर्णिमेचा भव्य दीपोत्सव; हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळला कृष्णा-वेण्णा नदीकाठ

by Team Satara Today | published on : 25 November 2026


सातारा : सातारा जिल्ह्यातील 'दक्षिण काशी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पवित्र संगमावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दीपोत्सवांपैकी एक असलेल्या या नयनरम्य सोहळ्याची साक्ष देण्यासाठी सातारा शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी कृष्णा घाटावर अलोट गर्दी केली होती.
पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर संगम माहुलीतील सुमारे ३५३ वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक आणि पेशवेकालीन श्री रामेश्वर मंदिर तसेच घाटावरील इतर प्राचीन शिवमंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. घाटाच्या दगडी पायऱ्यांवर आणि नदीपात्रात तब्बल २,५०० हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संथ पाण्यात पडणारे या असंख्य दिव्यांचे प्रतिबिंब डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. यावेळी अनेक भाविकांनी प्रभू शिवशंकराचे दर्शन घेत नदीपात्रात दीपदान करून सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेली कृष्णामाई आणि वेण्णामाईची भव्य महाआरती. याप्रसंगी पारंपरिक वाद्यांचा गजर, मंत्रोच्चार, त्रिपुरासुर दहन, आधुनिक लेझर शो आणि आकाशात उडणाऱ्या नेत्रदीपक फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण संगम परिसर दुमदुमून आणि उजळून निघाला. हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा जपण्यासाठी स्थानिक पातळीवर आयोजकांनी घेतलेली मेहनत अत्यंत कौतुकास्पद ठरली.
श्री रामेश्वर जीर्णोद्धार मंडळाने मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने २,५०० दिव्यांच्या दीपोत्सवाचे नियोजन केले होते. यासोबतच जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले, सदस्य कामेश कांबळे व त्यांच्या मित्र समूहाने भव्य आतषबाजीचे नियोजन करून सोहळ्याची शोभा वाढवली. तसेच अजित साळुंखे, नगरसेवक फिरोज पठाण, बाळासाहेब महामुलकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले. या भव्य आयोजनामुळे संगम माहुलीच्या धार्मिक पर्यटनाला आणि सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी मिळाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेंद्रे येथे कृष्णा राजस्थानी ढाब्यासमोर एक्स्प्रेस कॅरिअरच्या ट्रकमधून 95.64 लाखांचा माल लंपास; चौघांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
दिव्यांग बांधवांनी पुढाकार घेत वाहिली स्व. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेबाबत संताप

संबंधित बातम्या