लग्नाचे आमिष दाखवून ७५ लाखांची फसवणूक; एका महिलेवर कोरेगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 21 October 2026


कोरेगाव : विवाह जुळवणीच्या वेबसाईटवर ओळख करून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर सोन्याच्या खाणींच्या देखभालीचे काम करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून कोरेगाव येथील एका स्टेशनरी व्यावसायिकाची ७५ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेवर कोरेगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी दीपक मोतीलाल अग्रवाल (वय ४१, रा. कोरेगाव) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीपक अग्रवाल यांचे कोरेगाव रेल्वे स्टेशनजवळ स्टेशनरी विक्रीचे दुकान आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते विवाह जुळवणीच्या एका वेबसाईटवर नोंदणीकृत आहेत.
२५ जून २०२५ रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांना अपर्णा विवेक अग्रवाल नावाच्या महिलेची लग्नासाठी विनंती आली. तिची प्रोफाईल पाहिल्यानंतर अग्रवाल यांनी ती स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये वेबसाईटवरून तसेच व्हॉट्सॲप आणि फोनवरून संवाद सुरू झाला. अपर्णाने आपण मूळच्या कोलकाता येथील असून सध्या कुटुंबासह बंगळुरू येथे राहत असल्याचे सांगितले.
दरम्यान, अपर्णाने एका कंपनीत तीन वर्षांपासून गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. या कंपनीत पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष तिने दाखविले. तिच्या सांगण्यावरून अग्रवाल यांनी संबंधित वेबसाईटवर जाऊन गुंतवणुकीची माहिती घेतली आणि पैसे भरण्यास सुरुवात केली. २ जुलै २०२५ रोजी त्यांनी ४३ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर कंपनीकडून त्यांच्या खात्यावर १ हजार ८०६ रुपये जमा झाले. पुढे ५ जुलै रोजी ३ हजार ६९८ रुपये मिळाल्याने गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचा त्यांचा विश्वास बसला.
त्यानंतर त्यांनी विविध बँक खात्यांवर पैसे पाठविले. १७ जुलै रोजी संबंधित वेबसाईटवरील खाते तपासले असता त्यात ३९ लाख ५० हजार रुपये शिल्लक असल्याचे दिसले. हे पैसे काढून घेण्यासाठी त्यांना अनेक कारणे सांगण्यात आली. पैसे भरले तरच तुम्हाला अधिक पैसे मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले. यामुळे त्यांनी ७५ लाख ६१ हजार ६४० रुपये घेऊन माझी फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊसतोड मजुराचे अपहरण; सासपडे येथील घटना, बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
ओव्हरटेकच्या प्रयत्नात कराटे गावाजवळ एक जीप दरीत, दुसरी उलटली; दहा प्रवासी जखमी

संबंधित बातम्या