सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भाजपवासी झालेले वाईचे माजी आमदार मदन भोसले यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात भूकंप झाला असून महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
माजी आमदार मदन भोसले हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव असून किसनवीर सातारा साखर कारखान्याचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. कारखाना अडचणीत आल्याने तत्कालीन फडणवीस सरकारकडून मदत होईल या अपेक्षेने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. निवडणुकीत कारखाना हातून गेला आणि विधानसभेतही पराभव झाला. आता अजित पवार गट महायुतीसोबत असल्याने व विद्यमान आमदार मकरंद पाटील हे अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे आपल्या उमेदवारीविषयी मदन भोसले चिंतीत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी आठच्या सुमारास जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या सातारा येथील निवासस्थानी पोहोचून त्यांच्याशी कमराबंद चर्चा केली. यावेळी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी असलेल्या मदन भोसले यांच्या कन्या सुरभी भोसले याही उपस्थित होत्या. या भेटीत काय चर्चा झाली याबद्दल दोन्ही नेत्यांनी ताकास तूर लागू दिला नाही. तासाभरानंतर मदन भोसले यांच्या घरातून बाहेर पडताना दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होते. सध्याच्या भेटीगाठींविषयी विचारले असता, 'सगळे माझे मित्र आहेत' असे मिश्किल उत्तर जयंत पाटील यांनी दिले.
अजित पवार यांच्या बंडानंतर सुरुवातीला आमदार मकरंद पाटील शरद पवार यांच्यासोबत होते. मात्र नंतर ते अजित पवार गटात सामील झाले. त्यामुळे वाई - महाबळेश्वर - खंडाळा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून तुतारीला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे वाईत सक्षम पर्याय उभा करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून रणनीती आखली जात आहे. याचाच भाग म्हणून जयंत पाटील यांच्या मदन भोसले यांच्याशी झालेल्या भेटीकडे पाहिले जात आहे.
जयंत पाटील यांनी घेतली मदन भोसले यांची भेट
भेटीने राजकीय वर्तुळात भूकंप; महायुतीत अस्वस्थता
by Team Satara Today | published on : 25 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा