कराडमधील संभाव्य वाहतूक कोंडीच्या मेसेजमुळे संभ्रम

by Team Satara Today | published on : 26 July 2025


कराड : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते मलकापूर या दरम्यान साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल उभारला जात असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सेगमेंट लॉन्चर खाली उतरविण्याच्या कामामुळे 20 ते 25 दिवस एकाच लेनमधून वाहतूक सुरू ठेवली जाणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कराड, मलकापूरसह राज्यभरात खळबळ उडाली होती. मात्र, हा मेसेज तथ्यहीन असल्याचा दावा ठेकेदार कंपनीकडून करण्यात आला असून, वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम जानेवारी 2023 पासून सुरू झाले आहे. याच कामांतर्गत कराड व मलकापूर या दोन शहरांच्या हद्दीत सुमारे साडेतीन किलोमीटरचा नवा उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असले, तरी यापूर्वीच या कामाला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. संथगतीने काम सुरू असल्याने हे काम कधी पूर्ण होणार ? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शुक्रवारी सकाळी सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल झाला. त्यामुळे केवळ कराड, मलकापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. 

25 जुलैपासून नव्या उड्डाण पुलावरील सेगमेंट लॉन्चर काढण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे शनिवार, 26 जुलैपासून एकाच लेनवरून येणार्‍या व जाणार्‍या वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यामुळे 20 ते 25 दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी कराड शहरातील पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन व्हायरल मेसेजमध्ये केले होते. त्यामुळे वाहनधारकांमध्ये चिंता निर्माण होवून हा मेसेज अनेकांनी फॉरवर्ड केला.

दरम्यान, नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलावर ढेबेवाडी फाटा परिसरात लॉन्चर मशीन आहे. ही मशीन उतरविण्यापूर्वी मशीनचे छोटे - छोटे पार्ट सुटे केले जाणार असून ते क्रेनच्या मदतीने खाली उतरविले जाणार आहेत. ही कार्यवाही पुढील चार ते पाच दिवसात सुरू होणार असली तरी यामुळे वाहतुकीला कसल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही असा दावा ठेकेदार कंपनीकडून करण्यात आला आहे.

वास्तविक अगोदरच अडीच वर्षापासून काम सुरू असल्याने कराड व मलकापूरमधील स्थानिक नागरिक तसेच वाहन चालकांसह या महामार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक, प्रवाशी अक्षरशः वैतागलेले आहेत. त्यामुळे उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी अक्षरशः प्रार्थना केली जात असल्याचे अनेकदा पहावयास मिळते. मात्र याचा ठेकेदार कंपनीसह महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांवर काहीच फरक पडत नाही, हे दुर्दैवी अन् तितकेच संतापजनक आहे.

मागील अडीच वर्षात अनेकदा वाहतूक कोंडीमुळे काय अवस्था होते हे स्थानिकांसह महामार्गावरून प्रवास करणार्‍या वाहन चालकांसह प्रवाशांनी अनुभवले आहे. त्यामुळेच शुक्रवारी व्हायरल मेसेज पाहून राज्यभरातील वाहन चालकांसह प्रवाशी आणि स्थानिकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. मात्र दुपारनंतर ठेकेदार कंपनीकडून या मेसेजमध्ये तथ्य नसून वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हा उड्डाणपूल सुमारे साडेतीन किलोमीटरचा असून, यामध्ये 30 मीटर लांबीचे एकूण 91 गाळे आहेत. 90 गाळ्यांवर 1 हजार 212 सेगमेंट बसविण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. आता अखेरच्या 30 मीटर गाळ्यातील सेगमेंट बसविण्याचे काम शिल्लक आहे. या गाळ्यात 11 सेगमेंट बसविले जाणार असले, तरी यापूर्वी सेगमेंट बसवूनही संबंधित ठेकेदार कंपनीकडून संबंधितांना पैसे अदा केले नाहीत. या केेलेल्या कामाचे पैसे मिळावेत. संपूर्ण काम पूर्ण केल्यास वेळेवर पैसे मिळणार नाहीत, या भावनेतून सेगमेंट बसविणार्‍या कामगारांसह संबंधितांनी हे काम अपूर्ण ठेवल्याचे सांगितले जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम
पुढील बातमी
जिल्ह्यात अवैद्य मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्यास राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर कळवावे

संबंधित बातम्या