उन्हाच्या तडाख्यात शाळा सुरूच; कडवे बुद्रुकमध्ये पालक-ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 05 May 2026


सातारा  : कडवे बुद्रुक (ता. पाटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यातही अध्यापन सुरू ठेवण्यात आल्याने स्थानिक पालक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असताना प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेची नेहमीप्रमाणे असणारी उन्हाळी सुट्टी यंदा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लहान विद्यार्थ्यांना प्रचंड उष्णतेत शाळेत जावे लागत असून, यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, पावसाळी सुट्टी मात्र कायम ठेवण्यात आल्याने निर्णयातील विसंगतीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ग्रामस्थांनी सांगितले की, या संदर्भात शिक्षण विभागाकडे अनेकदा लेखी तक्रारी आणि पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी, प्रशासनाविषयी नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे.

दरम्यान, या परिस्थितीमुळे काही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत साशंक असून, याचा परिणाम शाळेच्या उपस्थितीवर होत असल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता तातडीने योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

जर पुढील काही दिवसांत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात शिक्षण विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तीन राज्यांतील भाजपच्या विजयाचा सातार्‍यात जल्लोष; मोती चौकात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; नागरिकांसोबत आनंद व्यक्त करत साखर वाटली
पुढील बातमी
सातारा शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये राहत्या घरातून दोनजणी बेपत्ता

संबंधित बातम्या