सातारा : सातारा शहराला लागून असलेल्या गोळीबार मैदान आणि शाहूनगर परिसरातील नागरिकांमध्ये सध्या बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज सायंकाळनंतर या भागांमध्ये बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत आहेत, ज्यामुळे रहिवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले अजिंक्यताऱ्यावर बिबट्याचे गेल्या काही वर्षांपासून वास्तव्य आहे. हाच बिबट्या किल्ल्याच्या लगत असलेल्या शाहूनगर, गोळीबार मैदान आणि अन्य कॉलनीमध्ये रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांच्या शोधात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शिवप्रेमी कॉलनीतील बंगल्यात बिबट्याचा शिरकाव या घटनेची गांभीर्य वाढवणारी बाब म्हणजे, गोळीबार मैदान परिसरातील शिवप्रेमी कॉलनीमध्ये बिबट्याने थेट एका बंगल्यात शिरकाव केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामुळे बिबट्याचा वावर आता नागरी वस्तीत किती खोलवर पोहोचला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
बिबट्याच्या सततच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे, सुरक्षितता आणि घराबाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. भीतीपोटी येथील रहिवाशांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांनी वनविभागाला स्पष्ट इशारा दिला आहे की, "वनविभागाने त्वरित या परिसराची पाहणी करावी आणि ज्या ठिकाणी बिबट्याचा सतत वावर आहे, त्या-त्या ठिकाणी पिंजरे लावून त्याचा बंदोबस्त करावा. अन्यथा, नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल". या घटनेमुळे सातारा शहरातील नागरी वस्तीजवळ वन्यप्राण्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पाऊले उचलली, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.