सातारा : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस कै. जयश्री यशवंत कारखानीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्तृत्व गौरव पुरस्कार देण्यात येतो. साताऱ्यात मराठी साहित्य चळवळ रुजवणाऱ्या, साहित्य क्षेत्रात राज्यात साताऱ्याचे नाव उज्जवल करणाऱ्या मसाप, शाहुपुरी शाखेस यंदाचा कतृर्त्व गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी दिली.
पत्रकात, मसाप शाहुपुरी शाखा गेल्या १६ वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेचे १४ वर्षे विनोद कुलकर्णी हे अध्यक्ष होते. त्यांचे नेतृत्व, मार्गदर्शनाखाली या शाखेने नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून साताऱ्यातील साहित्य क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे. शाखेतर्फे गेल्या १६ वर्षांपासून राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा राबवण्यात येतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शाखेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ लाख पत्रे पाठवली होती. तसेच दिल्लीत जाऊन मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनही केले होते. नुकतेच शाखेने सलग १२ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर साताऱ्यात ३२ वर्षानंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. शाखेने साहित्यच्या व्यासपीठावरुन सामाजिक कार्यास मदत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षाची बिनविरोध निवड असे अनेक नवीन पॅटर्न तयार केले आहेत. या सर्व कार्याचा गौरव म्हणून कै. जयश्री यशवंत कारखानीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कतृर्त्व गौरव पुरस्कार मसाप शाहुपुरी शाखेस जाहीर करण्यात आला आहे.
यापूर्वी हा पुरस्कार डॉ. अविनाश पोळ, सोमनाथ साबळे, रवी बोडके, सुनीताराजे पवार, डॉ.पारंगे यांना तर रयत शिक्षण संस्था, माहेश्वरी संस्था, योग विद्या धाम संस्था, आनंद आश्रम, गतिमंद मुलांची संस्था समर्थ मंदिर आदी संस्थांना दिला गेला आहे. हा पुरस्कार वैयक्तिक कर्तबगारी किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना देण्यात येतो. कै जयश्री यशवंत कारखानीस यांच्या स्मृत्यर्थ कारखाने कुटुंबीय यांनी हा कर्तृत्व गौरव पुरस्कार दरवर्षी देण्यासाठी नगरवाचनालयाकडे रक्कम सुपूर्द केली आहे. त्यानुसार यावर्षीचा पुरस्कार मसाप शाहुपुरी शाखेस जाहीर करण्यात आला असून लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.