बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळे सज्ज; विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा अलर्ट; नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्याकडून सुविधांची पाहणी

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : गणरायाच्या विसर्जनासाठी सातारा शहरातील यंत्रणा सज्ज करण्यास पालिका प्रशासनाने वेग दिला आहे. बुधवार नाका परिसरातील कृत्रिम विसर्जन तळे, विसर्जन मार्ग आणि भाविकांच्या सुविधांची नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. विसर्जनाच्या दिवशी होणारी संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेची आव्हाने लक्षात घेऊन नियोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
गणेशोत्सव काळात बुधवार नाका परिसरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे कृत्रिम तळ्याची स्वच्छता, परिसरातील प्रकाश व्यवस्था, भाविकांची सुरक्षित ये-जा आणि विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची पाहणी करण्यात आली. गर्दीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवेश व निर्गमन मार्गांची आखणी तसेच वाहतुकीचे नियमन यावरही भर देण्यात आला आहे.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी विसर्जन तळ्यावरील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. भाविकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच विसर्जनाच्या दिवशी नगरपालिका यंत्रणेने पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावे, असे निर्देश त्यांनी दिले. स्वच्छता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी विसर्जन प्रक्रियेतील संभाव्य गर्दीचा आढावा घेतला. विसर्जनानंतर परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त स्वच्छता पथकांसह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज शेंडे, अक्षय जाधव, विश्वतेज बालगुडे, रविराज किर्दत, उपअभियंता विनोद दहिफळे, नियंत्रण अधिकारी दिलीप चिद्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज : पांडुरंग बलकवडे. फाशीचा वड येथे अभिवादन. कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती
पुढील बातमी
प्रेमसंबंध संपविल्याच्या रागातून तरुणीला धमकी देणाऱ्या युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या