राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी बाजू मांडण्यासाठी मागितली मुदत; अपात्रतेवर निर्णयासाठी आता ७ मे रोजी सुनावणी

by Team Satara Today | published on : 29 April 2026


सातारा  : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या अपात्रतेच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी पार पडली. या प्रकरणात संबंधित सदस्यांकडून बाजू मांडण्यासाठी मुदत मागण्यात आल्याने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुढील सुनावणी ७ मे रोजी ठेवली आहे.

२० मार्च रोजी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) येथील काही सदस्यांनी पक्षविरोधी भूमिका घेत भाजप उमेदवाराला मतदान केले होते. या क्रॉस व्होटिंगमुळे भाजपला सत्तास्थान मिळाले. यामध्ये कामेश कांबळे, लता कर्णे आणि ऋतुजा जगताप या सदस्यांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व माजी जि.प. अध्यक्ष उदय कबुले यांनी संबंधित सदस्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी संबंधितांपैकी कामेश कांबळे हे एकमेव सदस्य उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान, संबंधित सदस्यांच्या वतीने वकिलांनी आपली बाजू मांडण्यासाठी मुदत मागितली. तसेच इंग्रजीतील तक्रार अर्जाचा मराठी अनुवाद मिळावा, यासाठीही अर्ज सादर करण्यात आला. यावर तक्रारदारांच्या वतीने ॲड. दत्तात्रय घोडके यांनी आपली बाजू मांडली.

दरम्यान, फुटीर सदस्यांकडून सविस्तर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांनी पुढील सुनावणी ७ मे रोजी ठेवली असून, त्या दिवशी या प्रकरणात महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) येथील दोन सदस्यांनीही भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरेगाव तालुक्यातील या दोन्ही सदस्यांविरोधातही अपात्रतेची तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यासंदर्भातील सुनावणीही जिल्हाधिकारी यांच्यासमोर झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सने साताऱ्यात नवीन शाखा उघडून महाराष्ट्रातील आपले स्थान केले अधिक बळकट
पुढील बातमी
स्वराज्यरक्षक छ. संभाजी महाराज स्मारकासाठी ५२९.८७ कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता - मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची माहिती

संबंधित बातम्या