सातारा : केंद्र सरकारने आणलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला आमचा तत्त्वतः विरोध नाही; मात्र महिला आरक्षण तत्काळ लागू करावे आणि लोकसभेची विद्यमान ५४३ सदस्यसंख्या वाढवू नये, या दोन प्रमुख अटी भाजपने मान्य कराव्यात. या अटी मान्य झाल्यास विधेयकाला पाठिंबा देण्यास आम्ही तयार आहोत, अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. डिलिमिटेशनच्या नावाखाली राजकीय गणिते आखून २०२९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याचा आणि त्यासाठी इंडिया आघाडी फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावावर चव्हाण यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, लोकसभेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत नेण्यास आमचा तीव्र विरोध आहे. इतक्या मोठ्या संख्येने खासदार झाल्यास भारताची संसद ही जगातील सर्वात मोठी संसद ठरेल. भाजपला भारताच्या संसदेचे रूपांतर चीनच्या संसदेत करायचे आहे का? सभागृहाचा आकार अनावश्यक वाढवल्यास संसदेचे महत्त्व आणि कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता आहे.
विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश संख्याबळासाठी भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. एप्रिलमध्ये नामंजूर झालेले हे विधेयक भाजपने पुन्हा आणले आहे. त्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्याकरिता उद्धव ठाकरे गट आणि आम आदमी पक्षाचे खासदार फोडण्याचे प्रयत्न गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत. तसेच डीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांनाही आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
सद्यस्थितीबाबत बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, भाजपने विधेयकाच्या समर्थनासाठी संख्याबळाची जुळवाजुळव केल्याची चर्चा असली, तरी डीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. डीएमकेला विनंती करण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रमुख नेते चेन्नईला गेले असून, दिल्लीत शरद पवार यांचीही पुन्हा भेट घेण्यात येणार आहे. स्वतः सोनिया गांधीदेखील आघाडी एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
घटनादुरुस्तीसारखे अत्यंत महत्त्वाचे विधेयक सर्व पक्षांशी सविस्तर चर्चा करून आणि सामंजस्याने पुढे नेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत चव्हाण म्हणाले की, भाजपने कोणतीही पूर्वचर्चा न करता हे विधेयक रेटून नेण्याचा प्रयत्न चालवला आहे. तरीही काँग्रेसने अधिवेशनात सामंजस्याची भूमिका घेतली असून, आमच्या दोन अटी मान्य केल्यास आम्ही सहकार्यास तयार आहोत.
विरोधी पक्षांच्या खासदारांसमोरील राजकीय पेच मांडताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांविरोधात भूमिका घेऊन जे खासदार निवडून आले आहेत, त्यांनी आता या विधेयकाला पाठिंबा दिल्यास ती मतदारांशी प्रतारणा ठरेल. भाजपला खरोखरच महिलांना आरक्षण द्यायचे आहे की डिलिमिटेशनच्या माध्यमातून २०२९ च्या निवडणुकीसाठी राजकीय फायदा मिळवायचा आहे, याचे उत्तर त्यांनी द्यावे.
डिलिमिटेशनच्या आड भाजपचा राजकीय डाव; इंडिया आघाडी फोडण्याचे प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण, आमच्या अटी मान्य झाल्यास विधेयकाला पाठिंबा देण्यास आम्ही तयार
by Team Satara Today | published on : 29 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा