खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश; महसूल-कृषी-पंचायत यंत्रणेला संयुक्त सर्वेक्षणाच्या सूचना

by Team Satara Today | published on : 27 September 2026


सातारा  : खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यतूट व अन्य निकषांच्या आधारे सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा आणि महाबळेश्वर या सहा तालुक्यांमध्ये ट्रिगर वन (Trigger-1) लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्रातील पिकांची वस्तुनिष्ठ स्थिती निश्चित करण्यासाठी पीक पाहणी व संयुक्त पंचनामे (Crop Survey) तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संबंधित क्षेत्रीय यंत्रणांना दिले आहेत.
मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू करण्यात आला आहे. कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अहवालाच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली आहे.
Trigger-1 लागू झालेल्या सहा तालुक्यांतील बाधित गावांमध्ये तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांचे संयुक्त पथक तातडीने गठीत करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी व पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकाही बाधित क्षेत्राची नोंद राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिलेत. पंचनाम्या दरम्यान बाधित पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शविणारी Geo-tagged छायाचित्रे तसेच अचूक GPS Coordinates संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ आणि पडताळणीयोग्य नोंद उपलब्ध होणार आहे.
गावनिहाय संयुक्त पंचनामे विहित नमुन्यात संकलित करून तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने एकत्रित तालुका अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा यांच्या कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. या अहवालाच्या आधारे शासनाला वस्तुस्थितीदर्शक माहिती वेळेत सादर करता येणार आहे.
Trigger-1 लागू झालेल्या क्षेत्रांमध्ये शासन निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेच्या निकषात शिथिलता, पिण्याचे पाणी व टँकर व्यवस्थापन तसेच जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन आदी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या कामास सर्वोच्च प्राधान्य देऊन एकाही बाधित क्षेत्राची नोंद सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, कार्यवाहीत दिरंगाई किंवा हलगर्जीपणा होऊ नये, असेही जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वानरांचा उपद्रवाने मांढरदेवीकर नागरिक त्रस्त; वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
पुढील बातमी
राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

संबंधित बातम्या