सातारा : पाटण तालुक्यातील नाडे-नवारस्ता येथे घोरपड या वन्यप्राण्याची शिकार करून प्लास्टिकच्या पोत्यामध्ये ठेवली होती. या प्रकरणी दोघा जणांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत वन विभागाने दिलेली माहिती अशी की, शनिवार, दि. 14 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घोरपडीची शिकार केल्यााची माहिती समोर आली. मारुती चीनाप्पा पवार यांना त्यांचे राहते घराजवळ मृत घोरपडीसहित पकडले. या गुन्ह्यातील संशयित आरोपी मारुती चीनाप्पा पवार, संपत रामचंद्र डिघे यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमअन्वये गुन्हा नोंद केला आहे.
ही कार्यवाही सातारा उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (कराड, पाटण) ललिता पाटील, वनपाल (मल्हारपेठ) ठोंबरे, वनरक्षक (मल्हारपेठ) संतोष यादव, वनरक्षक (पाटण) निखिल कदम, वनरक्षक (मोरगिरी) रोहित लोहार, रमेश कदम यांनी केली.