सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान वधाचे शिवप्रतापाचे शिल्प तातडीने बसवा व त्या समारंभाला महाविकासआघाडीच्या नेत्यांना आमंत्रित करा. माजी आमदार नितीन शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी श्री शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी भेट घेतली.
राजकोट येथील कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी राजकारण करीत आहे. त्याला उत्तर म्हणून राज्यातल्या महायुती सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्यासमोर महायुती सरकारने बनविलेला अफजल खान वधाचा पुतळा बसवून, या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमंत्रित करून सरकारने चोख उत्तर द्यावे. अफजलखानाच्या बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर फिरवायचा जसा धाडसी निर्णय घेतला तसाच अफजलखान वधाचे भव्य शिल्प उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली. तसेच अफजल खान वधाच्या भव्य शिल्पाचे मोठ्या थाटामाटात अनावरण करून, पुतळा बसवावा व या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने शिवभक्त घेऊन येऊ अशी ग्वाही माजी आमदार शिंदे यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केल्याची माजी आमदार नितीन शिंदे यांनी माहिती दिली.