सातारा : शहरातील गुरुवार पेठेत वृद्ध महिलेला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून तिच्या हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्या केअरटेकर महिला जहिरा रफिक शेख (वय 50, रा. प्रतापगंज पेठ, राधिका चौक) व तिचा साथीदार शैलेश हरिभाऊ साळुंखे (वय 49 रा. गुरुवार पेठ) यांना सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या या कारवाईत सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, संशयित जहिरा शेख हिला गुरुवार पेठेतील एका वृद्ध महिलेच्या देखभालीसाठी ठेवण्यात आले होते. या महिलेने दि. 14 ऑक्टोबर रोजी या वृद्धेला मसाज दिला. नंतर संधीवाताचे इंजेक्शन असल्याने त्रास कमी होईल, असे सांगून तिला इंजेक्शन दिले. इंजेक्शनमुळे वृद्ध महिला बेशुद्ध पडली. त्यावेळी तिच्या हातातील पाच तोळे वजनाच्या बांगड्या लांबविण्यात आल्या. वृद्धेच्या घरातून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने वृद्धेच्या नातेवाइकांनी घरी येऊन तिला शुद्धीवर आणल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. यासंदर्भात दि. 21 ऑक्टोबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. वृद्ध महिलेने सोन्याच्या बांगड्या कुठे ठेवल्या हे आठवत नसल्याचे सांगितले. नातेवाइकांनी केअर टेकर महिलेकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. गेल्या पंधरा वर्षापासून मी या व्यवसायात आहे मी असे करू शकत नाही, असे ठामपणे महिलेने सांगितले.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चौकशीचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे आणि त्यांच्या पथकाने चौकशी केली असता प्रश्नोत्तरांच्या सरबत्तीने महिला गडबडली. चौकशी झाल्यानंतर सातारा पोलिसांसमोर या महिलेने आपल्या साथीदारांमार्फत हा प्रकार केल्याचा गुन्हा कबूल केला. या महिलेला इंजेक्शन देण्यासंदर्भात आणि औषध देण्यासंदर्भात माहिती होती. तिने मधुमेह कमी करण्याचे इंजेक्शन मेडिकलमधून घेऊन ते संधिवाताचे इंजेक्शन असल्याचे खोटे सांगितले. इंजेक्शनची मात्रा जास्त झाल्याने शुगर लेव्हल कमी होऊन वृद्ध महिला बेशुद्ध पडली होती. केअरटेकर महिलेने वृद्ध महिलेच्या हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, सतीश मोरे, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिठे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.