सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर सातारा पोलिसांच्या विविध पथकाने अत्यंत दक्षतेने लपवण्यात आलेल्या बॉम्बला शोधून निकामी केले. तब्बल 45 मिनिटे ही प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी महाविद्यालय परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांचे हे मॉक ड्रिल झाले; पण सातारकरांच्या मनात उगाच शंका कुशंका येऊन गेल्या. प्रात्यक्षिके असल्याचे कळल्यावर सगळ्यांना हायसे वाटले.
बुधवारी दहशतवाद विरोधी दिन राज्यस्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबवला गेला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सातारा पोलिसांनी आपल्या सतर्कतेचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक दाखवत शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात मॉक ड्रिल केले. या ड्रिल मध्ये पोलीस मुख्यालयाचे गृह उपाधीक्षक अतुल सबनीस यांच्यासह सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम म्हेत्रे, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह 25 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 100 पोलीस कर्मचारी याशिवाय आरसीपी बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक यांच्यासह पुरेपूर यंत्रणा या ड्रिलमध्ये सहभागी झाली होती.
महाविद्यालयाच्या ठराविक परिसरामध्ये विशिष्ट ठिकाणी बॉम्बसदृश्य वस्तूचे टार्गेट सेट करण्यात आले होते. ते टार्गेट बीडीएस पथकाने अचूक शोधून काढत आपल्या कार्यक्षमतेचा परिचय दिला. बॉम्बशोधक पथकाच्या जवानांनी अत्यंत दक्षतेने टार्गेट पर्यंत जाऊन तेथील बॉम्बसूदृश्य वस्तूचा शोध घेऊन ती तात्काळ निकामी केली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पन्नास पोलिसांचा खडा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे नागरिकांना सुरुवातीला काहीतरी विपरीत घडल्याची शंका होती. मात्र त्यानंतर त्यांना मॉक ड्रिल असल्याचे समजल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 21 मे हा दहशतवाद विरोधी दिन. गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार पोलिसांची राज्यस्तरावर मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहेत. सातारा पोलिसांनी सुद्धा यामध्ये भाग घेऊन आपल्या कार्यक्षमतेचा परिचय दिला आहे, अशी माहिती गृह उपअधीक्षक अतुल सबनीस यांनी दिली.