पाचगणी : जुन्या वादाच्या कारणातून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संतोष लक्ष्मण शेडगे रा. भोसे, ता. महाबळेश्वर, जि. सातारा आणि भरत अनंत घरत रा. तुर्भे, नवी मुंबई यांच्यात जमिनीच्या कारणावरून जुने वाद आहेत. दि. 17 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेडगे हे त्यांच्या गाडीतून जात असताना त्यांचे अपहरण करून त्यांना तडजोडनाम्यासाठी जबरदस्तीने ओलीस ठेवत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्याकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध दबावाखाली तोडजोडनामा लिहून घेतल्याप्रकरणी भरत घरत आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुणे करीत आहेत.
आरोपींना तात्काळ गजाआड करा : संग्राम दादा रोकडे
पाचगणी सारख्या शांत पर्यटनस्थळावर दिवसाढवळ्या घडलेल्या संतोष लक्ष्मण शेडगे यांच्या अपहरणाच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडवली आहे. रिव्हॉल्वरचा धाक दाखवत, पोलीस असल्याचे भासवत भरत घरतसह अन्य इसमांनी केलेल्या या अपहरण, मारहाण आणि ब्लॅकमेलच्या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आरपीआय (A) गटाचे पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष संग्राम दादा रोकडे यांनी केली आहे.