मला शरद पवारांनी पाठविले, आपल्याला इतिहास घडवायचाय - शशिकांत शिंदे; कृष्णा साखर कारखाना निवडणुकीत संस्थापक पॅनलच्या प्रचार शुभारंभ

by Team Satara Today | published on : 05 June 2026


कराड : ‘सगळे नेते विरोधात जेव्हा एकत्र येतात, तेव्हा समजायचे आपला नेता अविनाश मोहिते सर्वांना पुरून उरतोय. त्यांच्यामागे रणरागिनीसारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अर्चना मोहिते यांना साथ देण्याचे काम कृष्णा कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी करायचे आहे. मला शरद पवार यांनी पाठविले आहे. मी त्यांचा निरोप घेऊन आलो आहे. अर्चनाताई मोहिते यांना अध्यक्ष करून आपल्याला इतिहास घडवायचा आहे. येत्या निवडणुकीत मातब्बरांचा पराभव करून त्या निश्चितपणे इतिहास घडवून आणतील,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

विंग, ता. कराड येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आयोजित कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलच्या प्रचार शुभारंभ मंगळवारी (दि. २) झाला. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष, संस्थापक पॅनलचे नेते अविनाश मोहिते, अर्चना मोहिते व उमेदवार उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘कृष्णाचे सभासद इतिहास घडवू शकतात, हाही एक इतिहास आहे. खोट्या केसेस टाकल्या, तरीही अविनाश मोहिते खंबीरपणे लढत आहेत. संस्थापकांनी उभा केलेला कारखाना डबघाईला आला असून, शेतकऱ्यांसाठी तो पुन्हा सक्षमपणे उभा राहावा, हीच त्यांची इच्छा आहे. प्रलोभने, आमिषांना भुलू नका. संस्थापक पॅनलने दिलेली सर्व आश्वासने निश्चितपणे पूर्ण होतील.’

कटकारस्थान करून अडचणीत आणले - अविनाश मोहिते 

अविनाश मोहिते म्हणाले, ‘गेल्या १० वर्षांत सत्ताधाऱ्यांनी एफआरपीपेक्षा अतिरिक्त दर दिलेला नाही. संस्थापक पॅनलच्या कार्यकाळात आदर्श चाललेल्या इरिगेशन योजना डबघाईला आणल्या. आम्ही शेतकऱ्यांना जादा दर, पाणी फेऱ्यांमध्ये वाढ, हजारो मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, कामगारांना २५ टक्के बोनस दिला. आम्हाला कटकारस्थाने करून अडचणीत आणले. परंतु, आम्ही कुणाचा एकही रुपया घेतला नाही.

स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सत्ताधाऱ्यांची ही धडपड सुरू आहे. अर्चना मोहिते म्हणाल्या, ‘सभासदांना १२० किलो विनामूल्य साखर देणार, पाणीपट्टी पैशांत आकारून एकरी ७,५०० रुपये करणार, असे सांगत इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पर्यावरणाचा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी - जिल्हाधिकारी संतोष पाटील; पाचगणी टेबललँड पर्यावरण संवर्धन पुस्तिकेचे प्रकाशन
पुढील बातमी
​कोयना नदीत पोहायला गेलेल्या गाडखोप येथील दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या