जागृतीचा विस्तव तेवत ठेवायला हवा : अरुण जावळे

मायणी येथे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

by Team Satara Today | published on : 31 July 2025


सातारा : ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षातून जगाने प्रेरणा घेतली त्या महामानवाची पाऊले सातार्‍याच्या मातीत उमटली आहेत, ही आपणासाठी गौरवाची बाब आहे. इथूनच त्यांच्या संघर्षाची कहाणीसुध्दा सुरू होते. याच मातीत त्यांना जातीयतेचे, अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले म्हणून त्यांनी स्वातंत्र्य, समता, बधुता, सामाजिक न्याय यासाठी मानवतावादी आंदोलन छेडले. डॉ. आंबेडकरांचे हे आंदोलन पुढे न्यायचे असेल तर जागृतीचा विस्तव तेवत ठेवायला हवा, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी केले.

मायणी येथील कला वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग व वाङ्मय मंडळाने आयोजित केलेल्या वाङ्मय मंडळ उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब कांबळे लिखित ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर : सातार्याच्या भूमीतील विचार व कार्य’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे होते. खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जितेंद्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाळासाहेब कांबळे हे सर्जनशील लेखक आहेत. त्यांच्या लेखणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक खानाखुणांचा घेतलेला मागोवा हा नव्या पिढ्यासाठी अभ्यासाची नवी दिशा देणारा आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व खूप आगळेवेगळे असून विविध स्तरावर या पुस्तकासंबधी कार्यक्रम व्हायला हवेत, अशी अपेक्षाही अरुण जावळे यांनी व्यक्त केली. प्रभारी प्राचार्य डॉ. जितेंद्र कदम म्हणाले, ग्रंथनिर्मिती ही एक महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे. ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी ठरणार आहे. त्यांची ज्ञानलालसा विद्यार्थ्यांनी अंगीकारली पाहिजे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे म्हणाले, महाविद्यालयात ग्रंथ प्रकाशन होणे ही गौरवास्पद गोष्ट आहे. विद्यार्थी दशेत लेखनाची सवय लागली, तर पुढे पुस्तकही लिहिता येते. लेखनकला ही माणसाचा विकास घडविते.

प्रारंभी कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले. बाळासाहेब कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान ’युवास्पंदन’ भित्तिपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आविष्कार संशोधन महोत्सव व युवा महोत्सव कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शौकतअली सय्यद यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. विजया कदम यांनी केले. यावेळी उपसरपंच दादासाहेब कचरे, मुख्याध्यापिका सौ. सुनीता बागडे, लेखिका रंजना सानप, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शहाजी खाडे, शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकर खाडे, प्रा. विकास कांबळे, डॉ. विलास बोदगिरे, कुंदा लोखंडे, डॉ. लक्ष्मण जठार, प्रा. शिवशंकर माळी, प्रा. श्रीकांत कांबळे, प्रा. मनोज डोंगरदिवे, डॉ.सुनील साठे, प्रा. अपेक्षा घाडगे, प्रा. रोहिणी मगर आदी मान्यवर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अण्णाभाऊंचा जन्मदिन 1 ऑगस्ट लेखन प्रेरणादिन पाळावा : कॉम्रेड सुबोध मोरे
पुढील बातमी
आषाढी वारीतील सेवेकरांसाठी रंगला कृतज्ञता सोहळा

संबंधित बातम्या