मुंबई : “विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या वतीने काल (17 मार्च) नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलकांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरही जाळली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हाही दाखल कऱण्यात आला. पण दुपारच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली, तिच्यावर धार्मिक मजकूर असल्याची अफवा रात्रीपर्यंत पसरवण्यात आली. त्यानंतर रात्री 8च्या दरम्यान 200-250 चा जमाव जमला आणि आग लावून टाकू अशाी घोषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी पोलिसांनी मध्यस्थी करत बळाचा वापर करावा लागला.” अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात झालेल्या दंगलीची माहिती दिली.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,” यापूर्वी बजरंग दलाची तक्रार द्यायची आहे असं काहींनी सांगितल. त्या आंदोलकांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तिथे त्यांची तक्रारही लिहून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना, दुसरीकडे 200-300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले, त्यांच्या तोंड कपड्यांनी झाकले होते. यात अनेक दुचाक्यांचेही नुकसान झाले, अनेक जण गंभीर जखमीही झाले.”
दुसऱ्या घटनेत, भालदारपुरा भागात 80-100 जणांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना अश्रुधूर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत एक क्रेन, आणि अनेक दुचाक्याही जाळण्यात आल्या. या संपूर्ण घटनेत 33 पोलीस जखमी झाले आहेत. यात ३ उपायुक्त दर्जाच्या पोलिस गंभीर जखमी झालेत. यातील एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. पाच नागरिक जखमी झाले आहेत. या प्रकऱणात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल कऱण्यात आले आहे. तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू कऱण्यात आली आहे.सात ते आठ भागातील प्रवेशाच्या ठिकाणी नाकाबंदी कऱण्यात आली आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याच्या महासंचालकांनी सर्व सीपी आणि एसपी यांच्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.
सगळ्यात सकाळची घटना घडल्यानंतर संध्याकाळच्या वेळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. दगडफेकीच्या ठिकाणी जवळपास एक मोठी ट्रॉली भरून दगड मिळाले आहेत. काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगडही अनेक ठिकाणी आढळून आले. अनेक ठिकाणी शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अगदी ठरवून, काही ठराविक घरांना, कार्यालयांना लक्ष्य कऱम्यात आले आहे. तीन डीसीपींवर हल्ला करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारात काही लोकांचा सुनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना सोडणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन करणार नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण ही आपली जबाबदारी आहे. सर्व समाजाचे धार्मिक सण सुरू आहेत. त्यामुळे कोणीही संयम सोडू नये. अशी विनंतीही देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.