सातारा : सुमारे 1 वर्षापूर्वी वडूज तहसील कार्यालयातील महसूल सहायक प्रवीण नांगरे याच्यावर 55 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी गुन्हा दाखल असताना त्यामध्ये अधिक तपासाअंती विद्यमान तहसीलदार बाई माने यांच्यासह आणखी 3 तलाठ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार मुळ गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
वडूज तहसीलदार श्रीमती बाई सर्जेराव माने, वडूज तहसीलमधील महसूल सहायक रविंद्र आनंदा कांबळे, औंध तलाठी धनंजय पांडूरंग तडवळेकर, भोसरे तलाठी गणेश मोहन राजमाने अशी नव्याने गुन्ह्यात सहआरोपी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती सातारा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांचे 2 डंपर वडूज महसूल विभागने पकडले होते. संबंधित दोन्ही डंपर सोडवण्यासाठी नांगरे याने 55 हजार रुपयांच्या लाचेची मागणी दि. 21 नोव्हेबर 2023 रोजी केली. ही रक्कम दुसर्या दिवशी म्हणजे दि. 22 नोव्हेंबर रोजी नांगरे याने तक्रारदार यांना त्याच्या ब्रीझा कारमध्ये ठेवण्यास सांगितली. यावरुन सातारा एसीबीने सापळा कारवाई करुन प्रवीण नांगरे याला अटक केली.
सातारा एसीबीने ही कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास पुणे एसीबी कार्यालयाच्या अपर पोलीस अधीक्षक शीतल जान्हवे- खराडे यांनी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळत गेली व त्यानुसार या प्रकरणात नांगरे याच्याप्रमाणेच तहसीलदार बाई माने व 3 तलाठी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन मूळ दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करुन नांगरे याच्याप्रमाणे आणखी चार जणांची नावे सहआरोपी म्हणून घेण्यात आली.