सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरचे वर्षा पर्यटन बहरले; निसर्गसौंदर्याचा पर्यटकांनी मनमुराद लुटला आनंद

by Team Satara Today | published on : 17 August 2026


महाबळेश्‍वर : सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधत राज्यासह परराज्यातील हजारो पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले होते. दाट धुके, हिरव्यागार डोंगररांगा, अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि सुखावणारा गारवा यामुळे महाबळेश्वरचे वर्षा पर्यटन बहरले आहे. अनेक दिवसांनंतर सूर्यदर्शन झाल्याने वातावरणातही प्रसन्नता पसरली आहे. महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्याचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला.

पावसाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्‍वरमध्ये यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १ जून ते १६ ऑगस्टपर्यंत ५५५१.२ मिमी (२१८.५५ इंच) पावसाची नोंद झाली आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता काहीशी उसंत घेतली असून अधूनमधून रिमझिम सरींसह सूर्यदर्शन होत आहे. त्यामुळे धुक्याने वेढलेल्या हिरव्यागार डोंगररांगा आणि ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळली आहेत.

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले लिंगमळा धबधबा, केटस्‌ पॉईंट, लॉडविक पॉईंट, मेटगुताड येथील मिनी भुशी डॅम परिसर, प्रतापगड, हस्तकला केंद्र आदी स्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.

महाबळेश्‍वरच्या वर्षा पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेला लिंगमळा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. दाट धुक्याच्या चादरीत उंचावरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मेटगुताड येथील मिनी भुशी डॅम परिसरातही पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची गर्दी झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथील माऊंटन ब्रीज हॉटेलमध्ये पाय घसरून पडल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू
पुढील बातमी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे : ना. जयकुमार गोरे; महायुतीतील राजकीय समीकरणांना नवा रंग

संबंधित बातम्या