बेकरी व्यावसायिकास धमकावून उकळली 25 लाखाची खंडणी

बोरगाव पोलिसांनी दोन तासात चौघांना केले जेरबंद

by Team Satara Today | published on : 13 May 2025


सातारा : बेकरी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देवून 25 लाख रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी चार संशयितांना अटक केल आहे. ही घटना जानेवारी 2024 ते 12 मे 2025 या दरम्यान घडली.

साहिल शिकलगार, परशुराम उर्फ भैय्या रविंद्र मोहिते, अमित उर्फ काळ्या अशोक मोहिते, रोहित संतोष मोहिते, अक्षय सर्जेराव मोहिते सर्व रा. नागठाणे ता. सातारा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद विकास राजेंद्र कोळेकर रा. बोरगाव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास कोळेकर हे बेकरी माल विक्रीचा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायानिमित्त ते दररोज पहाटे तीन वाजल्यापासून नागठाणे, तारळे परिसरात माल वितरणासाठी जात असतात. या दरम्यान, संशयित आणि कोळेकर यांची रस्त्यात अनेकदा भेट होत होती. जानेवारी 2024 मध्ये नागठाणे ते सासपडे रस्त्यांवर संशयितांनी मोटारसायकलवर येवून कोळेकर यांच्या वाहनाला अडवले. यावेळी परशुराम उर्फ भैय्या मोहिते याने स्वत:ला नागठाण्याचा भाई म्हणवत इथे व्यवसाय करायचा असेल तर दरमहा 1 ते दीड लाख रुपये खंडणी द्यावी लागेल अन्यथा तुला अन तुझ्या कुटुंबियाना जीवे मारु, अशी धमकी दिली. जीवाच्या भीतीने कोळेकर यांनी संशयितांना वेळोवेळी पैसे दिले. परशुराम मोहिते याने कान्हाभाईसाठी गुन्हे मिटवण्यासाठी गाडीचे कर्ज फेडण्यासाठी किंवा पत्नीचे मंगळसूत्र सोडवण्यासाठी अशी खोटी कारणे सांगत सतत धमक्या देवून सव्वा वर्षात ऑनलाईन 13 लाख रुपये आणि रोख 12 लााख रुपये असे एकूण 25 लाख रुपये उकळले. 11 एप्रिल 2025 पासून पुन्हा पैशाची मागणी सुरु झाल्याने कोळेकर याने मोबाईल बंद ठेवला. यामुळे चिडलेल्या संशयितांनी कोळेकर यांच्या बोरगाव येथील घर आणि सुदेश बेकरी येथे जावून त्यांच्या धाकट्या भावाला धमक्या दिल्या. या सततच्या त्रासाला कंटाळून 12 मे 2025 रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात साहिल शिकलगार, परशुराम मोहिते, व इतर तिघांविरुध्द तक्रार दिली. 

या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सदरची कारवाई ही बोरगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक डी एस वाळवेकर व महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सहा पोलीस फौजदार प्रविण शिंदे, पोना प्रशांत चव्हाण, पोना दिपक मांडवे, पोकॉ. प्रकाश वाघ, पोकॉ. सतिश पवार, केतन जाधव, संजय जाधव, विशाल जाधव यांनी केलेली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्मिता पाटील करीत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पोलिसांकडून अट्टल मोटरसायकल चोराला अटक
पुढील बातमी
दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या