नायगाव येथे कंपनीत कॉन्ट्रॅक्ट आणि ५ लाखांच्या खंडणीसाठी दमदाटी; शिरवळ पोलिसांकडून पाच जणांना अटक

by Team Satara Today | published on : 22 August 2026


शिरवळ :  नायगाव (ता. खंडाळा) येथील महाफंट इंडिया (शेरा) कंपनीमध्ये कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आणि दरमहा पाच लाखांची खंडणी उकळण्यासाठी चालकाला धमकावल्याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी विशाल नंदकुमार पवार (रा. कानेरवाडी, ता. कडेगाव, जि. सांगली), अभिजित गणपत साठे (रा. मोकरवाडी, नऱ्हेगाव, ता. हवेली, जि. पुणे), अक्षय रवींद्र डबाणे (रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली), विजय बंडू गलांडे (रा. पेठ, ता. तासगाव, जि. सांगली) आणि संकेत ज्ञानेश्वर येवले (रा. पसरणी, ता. वाई, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

संशयितांकडून गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातारा येथील 'एस. एम. एंटरप्रायजेस'लाच कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट मिळावे यासाठी दबाव आणला जात होता, तसेच दरमहा पाच लाख रुपये कमिशन देण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, गुरुवारी दुपारी संशयितांनी कंपनीचा मालवाहतूक करणारा ट्रक अडवून चालकाला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले आणि कमिशन का दिले नाही अशी दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर कंपनीचे एचआर अधिकारी महेश कोरटकर यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीवरून शिरवळ पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पाचही संशयितांना तत्परतेने जेरबंद केले. संशयितांना खंडाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजमाता नर्सिंग स्कूलमध्ये ग्रंथालय परिचय कार्यक्रम उत्साहात; नीतिमूल्यांचे संस्कार रुजवण्यासाठी जाणिवपूर्वक कार्य करण्याचे आवाहन
पुढील बातमी
दादागिरी करणार नाही, पण चुकीला ठामपणे विरोध करणार : शशिकांत शिंदे

संबंधित बातम्या