सातारा : रंगाचे दुकान फोडून त्यातील साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यास सातारा शहर डीबी पथकाने 24 तासांत जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुदीप संजय मेंगळे रा. सोनगाव (कुडाळ), ता. जावली, जि. सातारा. सध्या रा. कोयना सोसायटी, सदर बाजार, सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-सातारा महामार्गावरील महिंद्रा हॉटेलच्या शेजारील रंगवाला नावाच्या रंगाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील लॅपटॉप, प्लंबिंग साहित्य तसेच इतर साहित्य चोरून नेले होते. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सातारा शहर डीबी पथकाने गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती काढून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी केली. त्यातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चोरी बाबत विचारपूस केली असता त्याने ही चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच अन्य ठिकाणाहून देखील तांब्याचा पाणी तापवण्याचा बंब चोरी केला असल्याचे सांगितले. हा माल त्याने विक्री करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी लपवून ठेवला होता. तो पोलिसांनी हस्तगत केला असून त्याच्याकडून एकूण एक लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांवर यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल असून त्याने आणखीन कोठे चोरी केली आहे का, याबाबत अधिक तपास सुरू आहे. हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केवळ 24 तासांमध्ये उघडकीस आणून, आरोपीस अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, महेंद्र पाटोळे, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी सहभाग घेतला.