सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता बेल्जी शेफर्ड श्वानपथक

by Team Satara Today | published on : 19 August 2025


कराड : येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बेल्जियन शेफर्ड जातीचे बेल्जी श्वान दाखल झाले आहे. त्यामुळे फिरत्या पथकासोबत आता श्वानपथकही गस्त घालणार आहे. व्याघ्र प्रकल्पातील फिरत्या पथकाच्या वनरक्षक सारिका जाधव मुख्य डॉग हॅण्डलर व पाटणचे वनरक्षक अनिल कुंभार सहाय्यक डॉग हॅण्डलर आहेत. त्या दोघांनाही २६ जानेवारीपासून हरियाना येथील पंचकुला इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात २८ आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले होते. त्यानंतर ट्रॅफिक इंडियातर्फे बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उपलब्ध करूनदेण्यात आले. त्यामुळे श्वापदाची शिकार, अवैध व्यापारसहीत अवैध वृक्षतोडीवर आळा बसण्यास हातभार लागणार आहे.

खडतर प्रशिक्षण घेऊन बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वान बेल्जी येथे आले आहे. त्यांच्यासोबत डॉग हॅण्डलर कोल्हापूर वनवृत्तातील प्रादेशिक व वन्यजीव विभागात वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात १५ ऑगस्टपासून सेवा बजावण्यास सज्ज झाले आहे. त्यामुळे अवैध वन्यजीव व्यापार, शिकारीवरील देखरेखीचा नेटवर्क वाढणार आहे. ट्रॅफिक इंडिया संस्था वनस्पती आणि प्राण्यांच्या व्यापाऱ्यावर देखरेख करणारी जागतिक अशासकीय संस्था आहे. त्यांच्यातर्फे वन्यप्राणी, वनस्पती व्यापारावर लक्ष केंद्रित केले जाते. 

ट्रॅफिक ट्रेड रेकॉर्ड ॲनालिसिस ऑफ फ्लोरा फौना इन कॉमर्स वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर यांचा संयुक्त कार्यक्रम आहे. बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वान भारतात वन्यजीव संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणीसाठी व शिकारी विरोधी प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांची बुद्धिमत्ता, चपळता आणि मजबूत कार्यनीती महत्त्वाची आहे. त्यांना तसे प्रशिक्षण, अवैध वस्तू, शिकारी शोधण्यासाठी योग्य बनवते. व्याघ्र प्रकल्पांत शिकार, वृक्षतोड आणि संरक्षित प्राण्यांची तस्करीचे गुन्हे रोखण्याचा प्रयत्न या श्वान पथकाद्वारे होणार आहे.

देशभरातील अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगण, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र अशा आठ राज्यांत १४ श्वान प्रशिक्षण आहेत. तेथे ट्रॅफिक इंडियातर्फे प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षणावेळी परीक्षा झाली. त्या श्वान प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेत आठ राज्यांत सारिका जाधव व बेल्जी श्वान यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे, असेही सह्याद्री व्याघ्रने जाहीर केले.

सह्याद्री व्याघ्र राखीवमधून सारिका जाधव यांनी डॉग हॅण्डलर म्हणून राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ व ट्रॅफिक इंडियाच्या माध्यमातून बेल्जियम शेफर्ड जातीच्या श्वानाचे प्रशिक्षण पूर्ण होऊन आता ते कोल्हापूर येथे कार्यरत आहे. प्रशिक्षित श्वानामुळे वन व वन्यजीव संरक्षणात, अवैध वन्यजीव व्यापार रोखणे, शिकार प्रकरणांचा तपास व शोधमोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

- तुषार चव्हाण, संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युनेस्को टीमकडून ‘कास’वर वनस्पतींचा अभ्यास
पुढील बातमी
बदलीसाठी ७२ शिक्षकांनी दिले बोगस दिव्यांग प्रमाणपत्र

संबंधित बातम्या