सातारा : पुणे विभाग अंतर्गत कार्यरत पाच जिल्ह्यातील उमेद समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री अर्थात मानिनी जत्रा आयोजित करण्याचा बहुमान यावर्षी सातारा जिल्ह्याला मिळालेला आहे. ही मानिनी जत्रा शनिवार दि. ७ मार्च पासून १३ मार्च २०२६ अखेर जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार उत्पादनांबरोबर या पाच जिल्ह्यातील खाद्य संस्कृती- गावरान मेजवानीचा आस्वाद घेण्याची संधी सातारकरांसाठी उपलब्ध होणार आहे. याचबरोबर सायंकाळी सात ते दहा या वेळेत विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
पुणे ,सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पुणे विभागातील कार्यरत उमेद स्वयं सहाय्यता महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री पुणे विभागीय सरस अर्थात मानिनी जत्रा सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन बोलत होत्या. यावेळी प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना नागराजन म्हणाल्या, ग्रामविकास विभागाद्वारे दरवर्षी उमेद अभियानांतर्गत स्थापीत समूहानी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शन दरवर्षी मुंबई येथे महालक्ष्मी सरस भरविली जाते. महालक्ष्मी सरस या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची उमेद अंतर्गत समूहातील सर्वच महिलांची इच्छा असते. मात्र हे शक्य होत नसल्यामुळे नागपूर येथे दुसरे राज्यस्तरीय प्रदर्शन आणि जिल्हास्तरावर तसेच विभाग स्तरावर सरस प्रदर्शन भरवले जाते. नुकतेच कराड येथे जिल्हास्तरीय मिनी सरस मानिनी जत्रा आयोजित करण्यात आली होती. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गतवर्षी सातारा येथे झालेल्या मिनी सरस मानीनी जत्रा उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली होती. यंदा पुणे विभागीय सरस आयोजित करण्याचा मान सातारा जिल्ह्याला देण्यात आला आहे. या प्रदर्शनामध्ये सातारा जिल्ह्यातील पारंपारिक उत्पादनांबरोबरच कोल्हापूरची सुप्रसिद्ध चप्पल, सांगलीचे बेदाणे, सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी आणि चादरी, भिगवनचे मासे, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा अशा दर्जेदार पदार्थांची खाद्य मेजवानी उपलब्ध होणार आहे.
प्रदर्शनाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री नामदार श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते व पालकमंत्री नामदार श्री. शंभुराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार श्री. मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार श्री. नरेंद्र पाटील, खासदार श्री. नितीन पाटील, खासदार श्री. उदयनराजे भोसले, खासदार श्री. धैर्यशील मोहिते पाटील, आमदार श्री. रामराजे नाईक निंबाळकर, आमदार श्री. शशिकांत शिंदे, आमदार श्री. जयंत आसगावकर, आमदार श्री. अरुण लाड, आमदार श्री महेश शिंदे, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार श्री. मनोज घोरपडे, आमदार श्री. सचिन कांबळे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.तुषार दोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे.
सदर प्रदर्शनास सातारकरांनी भेट देऊन ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.