सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात सध्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सव सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून महाशिवरात्री दिवशी बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून गुरुवारी पहाटे सहा वाजेपर्यंत विशेष महाशिवरात्र जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजिका सौ.उषा शानभाग यांनी दिली. या कार्यक्रमांमध्ये रात्री दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी सातारा येथील नृत्य साधना संस्थेचे गुरु सुधांश किरकिरे आणि सहकलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. त्यानंतर रात्री अकरा वाजता ध्यान आणि वासोळा भजनी मंडळाचे भजन संपन्न होणार आहे. रात्री बारा वाजता ध्यानधारणा तसेच या ध्यानाविषयी मंडळ आर्ट परिचय आणि त्याची प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. रात्री एक वाजता ध्यान तसेच सौ.मेघा मोरे या योगासने याविषयी माहिती देणार आहेत.
पहाटे दोन वाजता श्रीराम नामाचा जप करून ध्यानधारणा करण्यात येणार आहे. तीन वाजता ध्यान, आसन, योगासने याविषयी श्री.पानसे यांचे मार्गदर्शन होणार आहे. पहाटे चार वाजता नवाक्षरी आणि मृत्युंजय जप याविषयी सौ. उज्वला पाटणे यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच ध्याना विषयी माहिती देण्यात येणार आहे. पहाटे पाच वाजता ओमकार आणि चक्र ध्यान केले जाणार असून सकाळी पहाटे सहा वाजता आरती होऊन प्रसाद वितरण केला जाणार आहे.
या जागरण कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून आपल्या आध्यात्मिक बल आणि शक्ती वाढवावी तसेच महादेवाच्या असीम कृपेला प्राप्त व्हावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून या ठिकाणी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी सोबत आसन, पिण्याचे पाणी, शाल आणि सुती कपडे घालून यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.