तेव्हा माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं - पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

by Team Satara Today | published on : 16 August 2026


कराड : भाजपाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्यावर आपल्याला मंत्रिपद देण्यात यावे, अशी अट तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी घातली होती. तसेच काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या पक्षप्रवेशाला मान्यता दिली होती, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत मोठा दावा करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. मी मुख्यमंत्री असताना आमचं सगळं ठरलं होतं. त्यासाठी आम्ही सोनिया गांधी यांची परवानगी घेतली होती. त्यावेळी पक्षप्रवेशासाठी मुंडेंनी एक अट घातली होती. ‘मी खासदार आहे. पक्षप्रवेश केल्यावर राजीनामा द्यावा लागेल. पोटनिवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे मला मंत्री करा’, अशी मागणी मुंडे यांनी केली होती.  त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना न विचारता सोनिया गांधी यांना विचारून मी हो म्हणून टाकलं होतं.

पृथ्वीराज चव्हाण  यांनी पुढे सांगितले  की, त्यानंतर पंतप्रधानांनी मला बोलावलं आणि तू असं असं आश्वासन दिलं आहे का असं मला विचारलं. तेव्हा मी तुम्हाला विचारलं नाही ही माझी चूक झाली असे, त्यांना सांगितले.  त्यावेळी ते म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्याला पक्षात घेऊन मंत्री बनवल्यास ते लाच दिल्यासारखे होईल, त्यामुळे मी हे अजिबात करणार नाही. त्यावेळी काय बोलावं कुठे तोंड लपवावं हे मला कळेना. शेवटी, गोपीनाथ मुंडे यांना मंत्री बनवणं शक्य नाही, सॉरी, असं पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या दाव्यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. एका दिवंगत नेत्याच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं पृथ्वीराज चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.   



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागपंचमी उत्सवासाठी शिराळा नगरी सज्ज; यावर्षी ४१ जिवंत नागांचे दर्शन होणार,२० सीसीटीव्ही कॅमेरे अन् शेकडो पोलिसांची तैनाती
पुढील बातमी
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले कामाचे कौतुक

संबंधित बातम्या