सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सातारा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला आहे. "विचाराची लढाई ही विचारानेच लढली गेली पाहिजे, हिंसेचा मार्ग अवलंबणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे," अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.
या घटनेने जिल्ह्यातील पत्रकार आणि साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा पत्रकार अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनी या हल्ल्याचा कडाडून निषेध केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेऊन हल्लेखोरांची सखोल चौकशी करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना योग्य शासन घडवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, ज्येष्ठ पत्रकार हणमंत पाटील, गजानन चेणगे, सिद्धार्थ लाटकर, ज्ञानेश्वर भोईटे, रिझवान सय्यद, वैभव पतंगे, कैलास मायणे आदी पत्रकार उपस्थित होते.
अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारिता क्षेत्राचा आवाज दाबता येणार नाही. यापुढे विनोद कुलकर्णी यांच्या केसालाही धक्का लागला, तर संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार संघटना केवळ निषेध नोंदवून थांबणार नाहीत, तर या अन्यायाविरुद्ध कृतीतून सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा पत्रकार संघटनांनी यावेळी दिला.