सातारा : संपुर्ण सकारात्मकता व कृतज्ञता ही फार मोठी गोष्ट अरूण गोडबोले यांच्याकडे आहे. सर्वांच भलं करायचं काम हे अरूण गोडबोलेंनी केलं. माणसांचा संग्रह हा त्यांचा मोठा संग्रह आहे, आत्ताच्या काळात माणसं जमा करायला लागतात पण स्नेहाच्या धाग्यांनी जोडलेली माणसं ही अरूण गोडबोले यांची खरी कमाई आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी काढले.
करसल्लागार, साहित्य, चित्रपट, प्रकाशन, अध्यात्म आणि सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने नाममुद्रा कोरणारे सातार्याचे सुपुत्र अरूण गोडबोले यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन व अरूण गोडबोले लिखित आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभा प्रसंगी विजय कुवळेकर बोलते होते. यावेळी सज्जनगड येथील समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी, ज्येष्ठ संशोधक-साहित्यीक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, लोकप्रिय अभिनेते व्याख्याते राहुल सोलापूकर, सिध्दगिरी मठाचे मा. स. स. काडसिध्देश्वर स्वामीजी उपस्थीत होते.
यावेळी बोलताना कुवळेकर म्हणाले की, अरूण गोडबोले हा सर्वांच भलं चिंतणारा माणूस असून या माणसाला मी कधीही कोमेजलेला, निराश झालेला पाहिला नाही. चित्रपटापासून ते अंत्यसंस्कार मंडळापर्यंतच्या सर्व संस्थांचा केंद्रबिंदू असणारा हा माणूस आहे. पुढच्या पिढीचा जीवनमार्ग सुकर व्हावा या हेतूने त्यांनी आजपर्यंत पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे लेखन केले आहे. बहुआयामी व्यक्तीमत्व असणार्या अरूण गोडबोले यांना उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त सद्भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना काडसिध्देश्वर स्वामीजी म्हणाले की, आयुष्यभर अनेक उद्योग व्यवसाय करूनही परमेश्वराने माझ्याकडून करून घेतले अशी अरूणजींची वृत्ती आहे आणि त्याच भावनेने त्यांनी आपले जीवन जगले आहे. प्रत्येक गोष्ट करायची ती उत्तम कराची आणि योग्यवेळी त्यातून बाहेर पडायचे हा अलिप्तपणा त्तांच्या अध्यात्मामुळे आला असे मला वाटते. त्यामुळेच त्यांनी आत्मचत्रिच्या प्रस्तावनेत स्वानतः सुखाय याची जोड देत सकळ करणे जगदीशाचे असे शिर्षक दिले आहे. अरूण गोडबोले यांनी लिहीलेल्या ग्रंथांमधून पुढील पिढीला शाश्वत मार्गदर्शन होत राहिल.
सत्काराला उत्तर देताना अरूण गोडबोले म्हणाले की, आयुष्यात माणसं जोडून जपता आली हे आयुष्याचे मी सार समजतो. सातारकांनी गोडबोले कुटुंबाला भरभरून प्रेम दिले त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवासवर्णनापासून सुरू केलेला लेखन प्रपंच आज पाच चित्रपट, 50 हून अधिक पुस्तकांपर्यंत पोहचला आहे. आयुष्यात मागे वळून पहाताना आपण इतक्या गोष्टी केल्या याचेच खरे वाटत नाही. कोणत्याही क्षेत्रात काम करताना त्यातून अलिप्त होण्याची वृत्ती जोपासता आली त्यामुळे सकारात्मक काम करता आले.
यावेळी येथील योगेशबुवा रामदासी, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, राहुल सोलापूकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सौ. अनुमपा अरूण गोडबोले यांनी अस्खलीत हिंदीतून आपले मनोगत व्यक्त केले.
सह्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त अरूण गोडबोले व सौ. अनुपमा गोडबोले यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अरूण गोडबोले लिखित आत्मचरित्र सकळ करणे जगदीशाचे व कवितासंग्रह पारिजात या दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
सर्व पाहुण्यांचा सत्कार अशोक गोडबोले कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला. यांनी केला. कार्यक्रमाचे निटनिटके सूत्रंचालन प्रदीप कांबळे यांनी तर स्वागत व प्रास्ताविक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हाजी गुलाबभाई शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या पूर्वाधात ख्यातनाम गायिका विदूषी मंजुषा पाटील प्रस्तुत भक्तीसंगीताचा अभंगरंग हा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला सातारकर नागरिक, मान्यवर, गोडबोले मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.