सातारा : धर्मचक्र तप निमित्त साताऱ्यात जैन समाजातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या तपश्चर्येच्या निमित्ताने पंच्यान्हीका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अंतिम दिवशी बुधवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता खणआळी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली.
खास सजवलेल्या रथात तीर्थंकर परमात्म्याची मूर्ती विराजमान होती. मुनीवर गणधररत्न मा.सा.व. यांचे शिष्यगण, श्रावक–श्राविका, महिला मंडळे व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, बँडपथक व समाजबांधवांचा उत्साह यामुळे मिरवणुकीला वैभव प्राप्त झाले. या शोभायात्रेत तपस्या केलेले तपस्वी सुंदर अशा सजवलेल्या बगीमध्ये विराजमान होते. शोभायात्रेत यांसह अनेक समाजबांधव व पाहुणे मंडळी उपस्थित होते.
मिरवणुकीतून अहिंसा, सत्य, संयम व क्षमापना यांचा संदेश
मिरवणुकीचा मार्ग खणआळी–देवी चौक–मोती चौक–राधिका संकुल असा होता. ठिकठिकाणी भगवान महावीरांच्या जयघोषांनी वातावरण भक्तिमय झाले. मिरवणुकीतून अहिंसा, सत्य, संयम व क्षमापना यांचा संदेश देण्यात आला. पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमादरम्यान नागरिकांना मिष्टान्न वाटप करण्यात आले. संपूर्ण नियोजन खणआळी जैन संघ व पुण्यवर्धक ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते.