सातारा : आम्ही पुणेकर, इंडो-जपान समन्वयक समिती व सातार्यातील मराठा बिजनेस फोरम यांच्या संयुक्त सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या इंडो-जपान शिवस्वराज रथयात्रेचा सातार्यामध्ये बुधवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला. छत्रपती शिवरायांचा पुतळा बारा राज्यातून प्रवास करत 8 मार्चला जपानची राजधानी टोकियो येथे अनावरणासाठी जाणार आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेची सातार्यात अत्यंत देखणी सुरुवात झाली. या रथयात्रेच्या निमित्ताने सातारा नगरीने पुन्हा एकदा शिवकाल अनुभवला.
पारंपारिक वाद्य वृंद, पारंपारिक वेशातील मावळे, भगवे झेंडे आणि छत्रपती शिवरायांच्या घोषणा या माध्यमातून संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. सायंकाळी साडेसहाच्या नंतर संधीकालामध्ये या मिरवणुकीला गांधी मैदान राजवाडा येथून सुरुवात झाली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिव पुतळ्याची पूजा करण्यात येऊन त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. तब्बल 25 फुटाचा हा पुतळा बारा राज्यातून प्रवास करत आठ मार्च रोजी जपानला पोहोचणार आहे. शिवस्वराज्य यात्रेची अत्यंत चांगली सुरुवात सातार्यातून झाली. या रथयात्रेला मराठा बिझनेस फोरमचे श्रीधर कंग्राळकर, शिवस्वराज्य रथयात्रा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडावा यासाठी गेल्या दोन महिन्यापासून बैठकांचे सत्र सुरू होते.
मिरवणुकीच्या पुढे पारंपारिक वेषातील घोड्यावरील मावळे, त्याचबरोबर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, भगवा ध्वज घेतलेले धारकरी अशा भव्य वातावरणामध्ये आणि या मिरवणुकीमध्ये हिंदवी पब्लिक स्कूल, श्रीपतराव पाटील हायस्कूल, कमांडो अकॅडमी सातारा, गुरु अकॅडमी सातारा, शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यार्थी आणि बनवडीच्या जय श्रीराम हलगी ग्रुपच्या सहभागाने ही मिरवणूक निघाली. सातारकरांनी या मिरवणुकीला प्रचंड प्रतिसाद दिला. ही मिरवणूक गांधी मैदान- मोती चौक- देवी चौक येथून शेटे चौक मार्गे पोलीस मुख्यालय व तेथून पोवई नाक्याकडे मार्गस्थ झाली. शिवतीर्थवर मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आम्ही पुणेकर या संस्थेच्या मोजक्या संयोजकांच्या उपस्थितीत अल्पविश्रांती नंतर ही मिरवणूक पुणे येथे रवाना होणार आहे.