स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : हा हा, ही ही.. चा कल्लोळ, टाळ्यांचा कडकडाट, तुडुंब भरलेल्या स्टेडियमच्या कोपऱ्या कोपऱ्यातून हास्याची कारंजी उडत होती. मोबाईलचे टॉर्च लावून रसिकांनी पौर्णिमेच्या रात्री ताऱ्यांची चमक दाखविली. निमित्त होते ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाचे.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी (दि. ३) ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अरुण कदम, प्रभाकर मोरे, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, निखिल बने, प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश शिवलकर, शिवाली परब, दत्तू मोरे, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर या कलाकारांना प्रत्यक्ष बघण्यासाठी संपूर्ण साताराच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून रसिक मोठ्या संख्येने आले होते. कलाकारांचा तसेच निर्माते सचिन गोस्वामी, लेखक-निर्माते सचिन मोटे, सत्कार संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनिताराजे पवार, नंदकुमार सावंत, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमाच्या तासभर आधीपासूनच मंडपात प्रेक्षक जागा पकडून बसले होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतरही रासिकांचा ओघ सुरूच होता. अखेर स्टेडियम काठोकाठ भरल्याने बॅरीगेट्स लावून प्रवेश बंद करावा लागला. साताऱ्याचा लाडका सावत्या (रोहित माने) आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी निवेदनातून रसिकांचे स्वागत केले. यावेळी हास्य जत्रेतील गाजलेली अनेक प्रहसने सादर करण्यात आली. सुरुवातीस समीर चौगुले आणि नम्रता संभेराव यांनी शाळेचे प्रहसन सादर केले. एकही पंच खाली पडू न देता सातारकरांनी कलाकारांना भरभरून दाद दिली. लोकांचे निखळ मनोरंजन करणारी आणि मनमुराद हसवणारी विविध प्रहसने हास्य जत्रेच्या कलाकारांनी सादर केली. सातारकरांनी दिलखुलास प्रतिसाद देत हस्य जत्रेला डोक्यावर घेतले.