मुंबई : मराठी एकीकरण समितीने आज (बुधवारी) दादरमधील कबूतरखाना परिसरात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबूतरखाना परिसरातील दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तसेच, जैन मंदिराचा मुख्य दरवाजाही बंद ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती दादर परिसरात पोहोचले असून आक्रमक झाले आहेत.
दुसरीकडे आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून (Dadar Police) नोटीसा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मराठी एकीकरण समितीने पोलिसांकडून मुस्कटदाबी होत असल्याचे म्हटले असून, आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धडपकड केली जात आहे. तसेच मराठी एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, जैन समाजाचे जे मंदिर कबूतरखान्यासमोर आहे, त्याचा मुख्य दरवाजा नेहमी चालू असतो, तो आज बंद ठेवण्यात आला आहे. त्याच्यासमोरही पोलिसांची तुकडी तैनात आहे. बाजूच्या रस्त्यातून जैन धर्मीय मंडळींना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. तर मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनच्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. सहा ऑगस्टच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले आहे.