सातारा : कापड बाजारातील माथाडी, हातगाडी कामगारांसाठी स्वर्गीय नामदेवराव कदम (बापू) यांनी स्थापन केलेल्या दि सह्याद्री सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक 18 मे रोजी होत आहे. मतदान शाखानिहाय होणार असून गेली अनेक वर्षे पुरुषोत्तम माने यांनी बँक सक्षम ठेवलेली असून मागील वर्षाखेर केलेल्या अनऑडीटेड ताळेबंदानुसार बँकेने भरघोस नफा मिळवलेला आहे. बँकेने नेट एन.पी.ए 0 टक्के राखलेला आहे. त्यामुळे येणार्या वार्षिक सभेनंतर लाभांश मिळणार असल्याची सभासदांना खात्री आहे, असा ठाम विश्वास सहकार पॅनलचे उमेदवार तथा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात जाधव यांनी म्हटले आहे की, सहकार पॅनेल मधून स्वतः पॅनल प्रमुख पुरुषोत्तम माने निवडणूक लढवित असून सहकार पॅनेल मध्ये मल्टीनॅशनल कंपनीचे संचालक असलेले किरण देसाई, सहकारी लेखापरीक्षक व सल्लागार अंकुश जाधव, अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष डी. एस. शिंदे, सहकार क्षेत्रामध्ये वकिली करणारे किरण निकम, समाजकार्यात अग्रेसर असणारे इस्माईल सय्यद, तसेच माथाडी कामगार म्हणून कामे करणारे आणि कामगारांशी फार मोठा लोकसंपर्क असलेले हणमंत कदम, बाबुराव कुंभार, संजय गिरीगोसावी आणि राम नामदास असे विविध क्षेत्रात कार्यरत असलेले चारित्र्य संपन्न आणि बँकिंगचा अनुभव असलेले उमेदवार रिंगणात आहेत. सहकार पॅनलचे उमेदवार उच्च विद्या-विभुषीत, अनुभवी आणि सुसंस्कृत असून बँक सुरक्षित ठेवून सभासदांच्या हितासाठी काम करणार असल्याची खात्री सभासदांना आहे. सहकार पॅनलच्या उमेदवारांना आकाश कंदील निशाणी मिळाल्याने या पॅनलचा विजय निश्चित होणार असल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.