शिखर शिंगणापूर : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच शिखर शिंगणापूर याठिकाणी येऊन शंभू महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी शिंगणापूरचे उपसरपंचांनी ना. गोरे यांची पेढेतुला करून आपला नवस पूर्ण केला. यावेळी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
माण तालुक्याचे आ. जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारून विरोधकांचे पानिपत केले. त्यांनतर जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. ना. गोरे हे मंत्रीपद मिळाल्यानंतर गुरुवारी प्रथमच शिंगणापूरमध्ये आले. ना. जयकुमार गोरे यांनी सपत्नीक शंभू महादेवास अभिषेक केला. विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे हे 50 हजारांच्या विक्रमी मतांनी विजयी झाल्यानंतर गोरे यांना मंत्रिपद मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी शंभू महादेवाला साकडे घातले होते. शिंगणापूरच्या उपसरपंच राजेंद्र पिसे यांनी गोरे यांना मंत्रिपद मिळाल्यास त्यांच्या वजनाएवढ्या पेढ्यांची तुला करण्याचा नवस केला होता. मंत्रीपद मिळाल्यानंतर ना. जयकुमार गोरे आज प्रथमच शभू महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी शिंगणापूर ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच पिसे यांनी शिंगणापूर मंदिरात ना. गोरे यांची भव्य पेढेतुला केली.
यावेळी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, तहसीलदार विकास अहिर, शिंगणापूरचे माजी सरपंच राजाराम बोराटे, सरपंच अनघा बडवे, शीतल बडवे, शैलेश बडवे, चैतन्य बडवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर विकासासाठी यापूर्वी प्रमाणावर निधी दिला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाची जबाबदारी माझ्यावर असून यापुढेही शिंगणापूर विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ना. जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली. शिंगणापूरमध्ये येणार्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. शिंगणापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच मंजूर करण्यात येईल, असेही गोरे यांनी यावेळी सांगितले.