सातारा : जिल्हा परिषद आणि कोरेगाव पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत सुजाण मतदारांनी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचा पुरोगामी विचार जपला असून शरद पवार व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला आणि विचारांना भक्कम बळ दिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
या विश्वासाबद्दल तसेच लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार त्यांनी मानले. सातारा जिल्हा परिषद व कोरेगाव पंचायत समिती निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व इतर मित्र पक्षांच्या विजयी तसेच निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार समारंभ मंगळवारी सायंकाळी वडूथ येथे उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विजयी उमेदवारांसह निवडणूक लढवलेले अधिकृत उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सर्वांचा गौरव व सन्मान करण्यात आला.
विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी तसेच जनतेच्या सेवेच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी आमदार शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी ज्या उमेदवारांना अपेक्षित यश मिळू शकले नाही, त्यांनी खचून न जाता भविष्यात अधिक जोमाने काम करावे. पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.