पुणे : एका गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठार परिसरात पर्यटन करणाऱ्या पुणे शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांवर दंडात्मक प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी संबंधित तिघांची दोन वर्षांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दिले आहेत.
पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी महिला पोलिस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांचे पथक सातारा जिल्ह्यात आले होते. मात्र, संबंधित पथकाने गुन्ह्याचा सखोल तपास न करता केवळ वरवरचा पंचनामा करून तपास उरकला. त्यापुढील तपासाकडे दुर्लक्ष करत या पोलिसांनी थेट कास पठार आणि परिसरातील इतर पर्यटनस्थळांची सैर केली. तपासादरम्यान तक्रारदाराने दिलेल्या महत्त्वाच्या विनंती आणि माहितीकडेही या पथकाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे समोर आले.
या निष्काळजीपणाची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, विभागीय चौकशीनंतर त्यांच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तपासातील हलगर्जीपणा आणि कर्तव्यात दाखवलेला निष्काळजीपणा भोवल्याने पोलिस वर्तुळात या कारवाईची मोठी चर्चा सुरू आहे.