फलटण : कोरेगाव (ता. फलटण) येथे असलेल्या मॅग्नेशिया केमिकल्स कंपनीच्या फिनीश गोडाऊनमध्ये दि. २० नोव्हेंबर रोजी पहाटे साडे दोनच्या सुमारास अचानक आग भडकली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मॅग्नेशिया केमिकल्स कंपनीचे तब्बल सात कोटी रुपये, तर अरिस्टा केमिकल्स कंपनीचे सव्वा कोटी रुपये इतके अंदाजे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच कंपनीचे डायरेक्टर भारत पालकर यांसह कामगारांनी तत्काळ गोंधळ टाळण्यासाठी कंपनीतील मॅन्युअल फायर अलार्म चालू केला. त्यामुळे सर्व कामगार सुरक्षित बाहेर पडले. पोलीस व अग्निशामक दलामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली.
ही आग एवढी मोठी होती की मॅग्नेशिया कंपनीतील ४०० ते ५०० टन फिनीश व रॉ मटेरीयल, बिल्डिंग स्ट्रक्चर, इलेक्ट्रिकल फिटिंग, केबल्स, टॅबलेट मशीन, कागदी साहित्य, पंपसेट तसेच कंपनीतील टाटा कंटेनर (एमएच ४६ बीएफ ३४०२) व टाटा ४०७ (एमआयआय ०८ ५९३१) यांसह मोठे नुकसान झाले. आगीचा प्रकोप शेजारील अरिस्टा केमिकल्स कंपनीपर्यंत पोहोचून त्यांच्या रॉ व फिनीश मटेरियलचेही जळीत नुकसान झाले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.