सातारा : गावागावांतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी चळवळ उभी करून गावचा विकास हा अजेंडा गावकऱ्यांनी ठेवला पाहिजे. ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. देश मजबूत करायचा असेल, तर गावे समृद्ध झाली पाहिजेत, असे सांगत गावाच्या विकासात सर्वांना सोबत घेऊन प्रत्येकाने काम करा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आदी उपस्थित होते.
गोरे म्हणाले, ‘‘गावकऱ्यांनी गावाला समृद्ध करण्याचा संकल्प करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी झाले पाहिजे. या अभियानात अधिकाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला पाहिजे. हे अभियान नंबर मिळविण्यासाठी नसून गावाला विकासात्मक मजबूत करण्यासाठी आहे. जिल्ह्यात योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी केली जाणार असून, विकासासाठी परिवर्तन होण्यासाठी चळवळ वाढली पाहिजे, तसेच या योजनेत जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही गावागावांत काम करणे आवश्यक आहे, तसेच या योजनेचे १७ सप्टेंबरला उद्घाटन होणार असून, त्यावेळी गावात योजनेची जनजागृती करा.’’
पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘लोकांच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचल्या पाहिजेत. सार्वजनिक हिताची कामे नेटाने व पद्धतशीर झाली पाहिजेत. गावच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे जिल्ह्यात यशस्वीपणे राबविले पाहिजे.’’ यावेळी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी योजनेविषयी मार्गदर्शन केले, तसेच मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पुस्तिकेचे प्रकाशन व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले.