सातारा : सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निखील पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर साताऱ्यातील पोलीस यंत्रणा चर्चेत आली होती. धक्काबुक्की, अटक आणि मतदान प्रक्रियेतील हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हा मुद्दा विधानमंडळातही गाजला. दोशी यांच्या निलंबनाची मागणी, त्यानंतरचे आदेश आणि त्यावरून निर्माण झालेले वाद यामुळे प्रशासनावर लक्ष केंद्रीत झाले होते. या पार्श्वभूमीवर दोशी काही दिवस अर्जित रजेवरही होते.
दरम्यान, राज्य सरकारने प्रशासनिक पातळीवर निर्णय घेत त्यांची बदली केली आहे. त्यामुळे झेडपी निवडीनंतर सुरू झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे.
नवे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना विविध जिल्ह्यांतील कामाचा अनुभव आहे. त्यांनी पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, तसेच लातूर आणि गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असून प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्याकडून साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
साताऱ्यातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राजकीय तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.