तब्बल 15 वर्षांनी मुलगा सुखरूप घरी; वडील व नातेवाईकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; उंब्रज पोलिसांचे सहकार्य

by Team Satara Today | published on : 12 August 2026


कराड : आईच्या निधनानंतर तणावाच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी घरातून निघून गेलेला रोहन कृष्ण थोरात हा तब्बल 15 वर्षांनी सुखरूप घरी परतला. मुलाला पाहताच वडील आणि नातेवाईक भावुक झाले. उंब्रज पोलिसांच्या सहकार्याबद्दल कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.

रोहन कृष्ण थोरात, (रा. कोटी, ता. कराड) हा दि. 13 जानेवारी 2011 रोजी आईच्या निधनानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत राहत्या घरातून निघून गेला होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी उंब्रज पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर उंब्रज पोलिसांकडून तसेच नातेवाईकांकडून रोहनचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र, दीर्घकाळ त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.

दरम्यान, 10 ऑगस्ट 2026 रोजी रोहन थोरात घरी परतला. त्यानंतर नातेवाईक त्याला घेऊन उंब्रज पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्याची आवश्यक चौकशी करून ओळख व कागदपत्रांच्या आधारे तोच 2011 मध्ये बेपत्ता झालेला रोहन कृष्ण थोरात असल्याचे निष्पन्न केले.

तब्बल 15 वर्षांनंतर मुलगा सुखरूप मिळाल्याने त्याचे वडील व नातेवाईक भावुक झाले. मुलाची भेट झाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी कुटुंबीयांनी उंब्रज पोलीस ठाण्याने केलेल्या सहकार्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.

हरविलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मोहीम सुरू

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मिसिंग शोध मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्षानिमित्त सामूहिक गायन व सायबर जनजागृती रॅली उत्साहात
पुढील बातमी
अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात 1,236 प्रकरणे मार्गी - पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

संबंधित बातम्या