माणदेश जिल्ह्याबाबत प्रत्यक्षात कार्यवाही नाही : ना. जयकुमार गोरे

सातारा : दुष्काळी पट्टा म्हणजे माणदेशी पट्टा याची पूर्वीपासून चर्चा आहे. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, माण, खटाव, फलटण असा जो दुष्काळी पट्टा येतो या दुष्काळी पट्ट्याचा वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसांपासूनची काही लोकांची कल्पना आहे. त्याबाबत अजूनतरी प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. तसे झाले तर त्याचे स्वागत करु. पण हे करत असताना दुष्काळी भाग एकत्र करुन विकसीत जिल्हा तयार होईल असे समजायचे कारण नाही. सरकार जेव्हा नवीन जिल्ह्याबाबत विचार करेल तेव्हा सर्व गोष्टी समोर येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्‍यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या मैदानावर मानिनी जत्रेतील स्टॉलची पाहणी करत होते. त्यावेळी पत्रकारांशी ना. जयकुमार गोरे यांनी संवाद साधला. माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचा एक मेसेज सोशल मिडीयाच्या माध्यमातून फिरत आहे. या प्रश्नावर बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, वास्तविक असा प्रस्ताव समोर आलेला नाही. काही कल्पना लोकांच्या होत्या. यासंदर्भात काही लोक काम करत आहेत. दुष्काळी पटट्यात काम करणारी लोकं आहेत. दुष्काळी पट्टा म्हणजे माणदेशी पट्टा याची पूर्वीपासून चर्चा आहे. या दुष्काळी पट्याचा वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसांपासूनची लोकांची कल्पना आहे. त्याबाबत अजूनतरी प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. हे करत असताना सर्वांना सोबत घेवून समन्वय राखून जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक परिस्थिती, लोकांची मानसिकता व विकासाची आवश्यकता याचा विचार करून सरकार नवीन जिल्ह्याबाबत विचार करेल, तेव्हा या सर्व गोष्टी समोर येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता तरी असला कोणताही विषय सरकार समोर नाही, असे ना. गोरे यांनी स्पष्ट केले.

ना. गोरे म्हणाले, उमेदच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होवून स्वत:च्या पायावर उभ्या राहत आहेत. ज्या महिला कुणावर तरी अवलंबून रहात होत्या त्या महिला सक्षम होवून पुढे येत आहेत हे उमेदचे यश आहे. लाडकी बहिणीचे थकीत हप्ते राहिले आहेत या प्रश्नावर बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, लाडकी बहिण योजना देवेंद्र फडणवीस व सरकारची आहे. पाच वर्षे ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींचा चालू महिन्याचा हप्ता राहिला असून तो दि. 26 जानेवारीच्या आत तो त्यांना मिळेल. लाडक्या बहिणींची चिंता लाडक्या बहिणींचे सरकार करेल कोणीही चिंता करू नका, असेही ना. जयकुमार गोरे म्हणाले.

पालकमंत्रीपदाबाबत कधीपर्यंत चित्र स्पष्ट होईल या प्रश्नावर बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, तुमची सर्व सुत्रे संपलेली आहेत. अंदाज संपलेले आहेत. मुख्यमंंत्री महोदयांनी ठरवलेले आहे. ज्या दिवशी सूत्र माहिती द्यायची बंद करतील त्या दिवशी पालकमंत्र्यांच्या नेमणुका होतील. 26 जानेवारीपूर्वी पालकमंत्र्यांच्या नेमणुका होवून 26 जानेवारी दिवशी पालकमंत्रीच ध्वजारोहण करतील, अशी ग्वाही ना. जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मागील बातमी
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे आवश्यक
पुढील बातमी
अमिताभ आणि ऐश्वर्याशी होणाऱ्या तुलनेवर अभिषेकचं वक्तव्य

संबंधित बातम्या