ऊसदराच्या चर्चेत तोडगा; जिल्ह्यातील कारखान्यांकडून ३९०० रुपये देण्याची तयारी; बैठकीत दराबाबत सहमती

अंतिम हिशेबासाठी ७०:३० सूत्राचा आधार, काटामारी रोखण्याचीही शेतकरी संघटनांची मागणी

by Team Satara Today | published on : 17 November 2026


सातारा : ऊसदराच्या प्रश्नावरून जिल्ह्यात निर्माण झालेला तणाव अखेर निवळण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. शेतकरी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिल्या उचलीसाठी प्रतिटन ३ हजार ९०० रुपये देण्याची तयारी दर्शविली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय चर्चेतून पुढे आला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच दरावरून निर्माण झालेल्या संघर्षाला तात्पुरता विराम मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून ऊसदराच्या मागणीवरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्ष सुरू होता. आंदोलन, निवेदने आणि चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही दराबाबत एकमत होत नव्हते. अखेर मंगळवारी नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पहिल्या उचलीचा प्रश्न मार्गी लावताना अंतिम ऊसदराचे गणितही चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. साखरेच्या दरातील चढ-उतार विचारात घेऊन आरएसएफच्या ७०:३० सूत्रानुसार अंतिम दर निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. फलटण तालुक्यातील कारखान्यांनीही जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत दरात तफावत ठेवू नये, अशी भूमिका मांडल्याचे समजते.
मात्र, शेतकरी संघटनांनी केवळ बैठकीतील आश्वासनांवर समाधान मानण्यास नकार दिला. जाहीर केलेल्या दराची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी ठाम मागणी करण्यात आली. विशेषतः ऊस वजनातील संभाव्य काटामारी रोखण्यासाठी मूल्यनिर्धारण समितीच्या पॅनलमध्ये शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
सर्व कारखान्यांनी आपापले ऊसदर तातडीने जाहीर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे आता कारखानानिहाय दरघोषणा आणि प्रत्यक्ष बिलातील अंमलबजावणी याकडे लक्ष लागले आहे.
दराची लढाई अद्याप संपलेली नाही!
पहिली उचल ३९०० रुपये करण्याबाबत झालेली सहमती म्हणजे संपूर्ण लढ्याचा शेवट नसून पुढील संघर्षाची दिशा ठरवणारा टप्पा आहे, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी मांडली. अंतिम ऊसदर निश्चित झाल्याशिवाय आंदोलनाची भूमिका बदलणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे पहिल्या उचलीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असले, तरी अंतिम दर आणि त्याची अंमलबजावणी हेच आगामी काळातील निर्णायक मुद्दे ठरणार आहेत.
कारखान्यांचे जाहीर ऊसदर :  
पहिल्या उचलीचे दर (प्रति टन)
अ.क्र.    कारखाना / नोंदीतील नाव    दर
१    यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना    ₹३,९००
२    रयत सहकारी साखर कारखाना    ₹३,९००
३    श्रीराम सहकारी साखर कारखाना .    ₹३,८००
४    जयवंत शुगर्स लिमिटेड चोराडे    ₹३,९००
५    ग्रीन पॉवर्स शुगर लिमिटेड गोपूज    ₹३,५००
६    शरयू सहकारी साखर कारखाना ३९१०     
७    दत्त सहकारी साखर कारखाना    ₹३,९१०
८    शिवनेरी सहकारी साखर कारखाना    ₹३,९००
९    अजिंक्यतारा सहकारी कारखाना शेंद्रे    ₹३,९००
१०      लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना / किसनवीर भुईज     ₹३,६००
११    सह्याद्री सहकारी साखर कारखाना    ₹३,९००
१२    स्वराज सहकारी साखर कारखाना    ₹३,८०५
१३    खटाव माण अग्रो प्रोसेसिंग पडळ    ₹३,८००
१४    प्रतापगड सहकारी साखर कारखाना    ₹३,८००
१५    जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना    ₹३,९००


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीतच राजकीय कसोटी; अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
पुढील बातमी
बेशिस्त रिक्षाचालकांना वाहतूक शाखेचा दणका; एका दिवसात 63 केसेस, 34 हजार 500 रुपयांच्या दंडाची आकारणी

संबंधित बातम्या