कृत्रिम, भेसळयुक्त दूधप्रकरणी शामगावच्या दाम्पत्याला अटक; अन्न व औषध प्रशासनाची कराड तालुक्यात मोठी कारवाई

by Team Satara Today | published on : 28 July 2026


कराड : कराड तालुक्यातील मसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दूध भेसळीविरोधातील पहिली मोठी कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी (दि. २६) रोजी शामगाव येथे रात्री ८:३० वाजता केली. या कारवाईत कृत्रिम व भेसळयुक्त म्हशीचे दूध तयार करताना दोघांना रंगेहाथ पकडले.

महेश यशवंत फाटक (वय ४४) व स्वाती महेश फाटक (३८, रा. शामगाव) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शामगाव येथील ओंकनाथ मंदिरामागील राहत्या घरावर टाकलेल्या धाडी छाप्यात केशरी व गुलाबी रंगाच्या किटल्यांमध्ये म्हशीचे दूध, रिफाइंड पामोलीन तेल, पांढऱ्या रंगाची संशयित पावडर, सुजाता कंपनीचा मिक्सर, सुमित कंपनीचा हँड ब्लेंडर तसेच इतर साहित्य आढळून आले. या साहित्याचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून ते मानवी आरोग्यास घातक असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.

तसेच भेसळीसाठी वापरण्यात आलेले रिफाइंड पामोलीन तेल व पांढरी पावडर पुरवणाऱ्या संशयित पुरवठादारांची माहितीही तपासातून शोधली जात आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ झाल्याचा आरोप करण्यात आला असून, आर्थिक फायद्यासाठी संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई सातारा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने उंब्रज पोलिस ठाण्याचे अतिरिक्त कार्यभार असलेले सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर भोसले, हवालदार महेश लावंड, बाळासो कोळेकर, सुनील पन्हाळे, अशोक पाटील तसेच महिला पोलिस कॉन्स्टेबल सुप्रिया इंगवले यांच्या सहकार्याने केली. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.

कठोर कारवाईची मागणी

अन्न औषध प्रशासन विभागाचे लोण ग्रामीण भागात पोहोचले असून शामगावसारख्या खेडेगावात टाकलेल्या धाडीने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. मानवी आरोग्यास हानी पोहोचवणारे भेसळयुक्त अन्न, दूध व इतर पदार्थ बनविणाऱ्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत ग्रामस्थ व महिला करत आहेत व सर्वजण आयुक्त तुकाराम मुंढे यांना धन्यवाद देत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सुप्रिया सुळे-अमित शाहांची भेट, पुन्हा राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा; शरद पवार म्हणाले "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही''
पुढील बातमी
गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या १८ वर्षांखालील आंदोलक विद्यार्थ्यांना तातडीने सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना कडक आदेश

संबंधित बातम्या